अंकनाद स्पर्धेतून मुलांच्या प्रतिभेला वाव.

 

अंकनाद स्पर्धेतून मुलांच्या प्रतिभेला वाव – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे पारितोषिक वितरण.

राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात पार पडला. यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित या उपस्थित होत्या.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था तसेच मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील 7 गटातील प्रातिनिधिक 7 विजेत्यांना श्री.देसाई यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी राज्यभरातून 1382 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये 11 हजार, 7 हजार, 5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे पारितोषिके म्हणून देण्यात आली.

भारतीय संस्कृतीतील चांगल्या परंतु काळाच्या ओघात मागे पडलेल्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न अंकनाद पाढे स्पर्धेतून होत आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमांतून मराठी भाषेचे वैभव पुढे येत असल्याने शासन अशा उपक्रमास प्रोत्साहन देत आहे. गणितासारखा भीती वाटणारा विषय अंकनादच्या उपक्रमातून नादमधूर होत आहे. गणिताच्या वाटेला जे जात नाहीत, त्यांनाही हा प्रवास आवडायला लागेल. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळेल, असे मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले.

अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाल्या, ताल, नाद याबरोबर गणिताचा प्रवास पुढे जात आहे, हे महत्त्वाचे आहे. यशस्वी व्हायचे असेल तर पाढ्यांना पर्याय नाही. मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय या शासनाने घेतला ही राज्यासाठी महत्त्वाची बाब आहे.

पारितोषिक विजेते :  स्वराज कुलकर्णी (प्रथम क्रमांक, बाल गट), कैवल्य खेडेकर (प्रथम क्रमांक, इयत्ता दुसरी-तिसरी गट), शाश्वत कुलकर्णी (द्वितीय क्रमांक, इयत्ता दुसरी-तिसरी गट), सृष्टी कुलकर्णी (प्रथम क्रमांक, इयत्ता सहावी सातवी गट), दामोदर चौधरी (द्वितीय क्रमांक, इयत्ता सहावी-सातवी गट), कृतीका किणीकर (प्रथम क्रमांक, इयत्ता आठवी ते दहावी गट),  दामोदर चौधरी (प्रथम, खुला गट ) यांना गौरविण्यात आले.

यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी, संचालक पराग गाडगीळ, मराठी काका उर्फ अनिल गोरे, समीर बापट,  निर्मिती नामजोशी,  वैशाली लोखंडे, रसिका सुतार, पार्थ नामजोशी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *