महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ.
अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार.
पुणे : शिक्षण क्षेत्रात वेगाने घडत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून अध्यापकांना त्यासाठी आवश्यक नवा दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
श्री. पवार म्हणाले, आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी नवा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे. अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून नव्या युगातील आधुनिक ज्ञान आणि प्राध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे शक्य होईल. चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल.
* गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा महाराष्ट्राने समृद्ध केला*
देशाला गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ गुरुजनांनी शिक्षणांची गंगा शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्याचे काम केले, महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले.
माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना नवा वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे कार्य केले. जयंत नारळीकर, जि.प.शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे कार्य मौलिक आहे.
बुद्धीवंतांना अधिक ज्ञानवान करणारी संस्था
अध्यापक विकास संस्थेमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल, शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र सुधारणा घडून येतील. जगातील नव्या ज्ञानाचा उपयोग प्राध्यापकांना झाल्यास त्याचा फायदा नव्या पिढीला होईल. पुणे येथे सारथी संस्था, सहकार भवन, कृषी भवन, कामगार भवन, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय आदी संस्था पुढील ५० वर्षांचा विचार करून उभारण्यात येत आहे. अध्यापक विकास संस्थेतही भविष्याचा विचार करून अधिक उन्नत सुविधा निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्र सुदृढ होण्याच्यादृष्टीने महत्वाचे पाऊल -उदय सामंत
श्री.सामंत म्हणाले, प्राध्यापकांना प्रशिक्षण देणारी देशातील ही पहिली संस्था आहे. अनेक नामवंत संस्था या संस्थेसोबत काम करीत आहेत. इन्फोसिसने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच सामंजस्य करार आहे. प्राध्याकांसमवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आधुनिक स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा ६० कोटींचा प्रकल्प असून त्याचा हा पहिला टप्पा आहे. हा प्रकल्प देशपातळीवर आदर्शवत ठरेल असा विश्वास श्री.सामंत यांनी व्यक्त केला.
ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल- आदित्य ठाकरे
श्री.ठाकरे म्हणाले, शिक्षक हे आजच्या काळातील तंत्रज्ञान आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षण महत्वाचे आहे. पुढची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. नवा देश, नवी पिढी घडविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण महत्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून असे कार्य होईल. आज शिक्षण पद्धतीत केले जाणार बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला.
खासदार बापट यांनी संस्थेच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील विदयार्थी आणि प्राध्यापकांना संस्थेचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकात संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यांनी संस्थेची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण हे महत्वाचे अंग आहे. राज्यातील ४ हजारपेक्षा अधिक महाविद्यालये आणि दीड हजार तंत्र शिक्षण महाविद्यालयातील सुमारे १ लाख प्राध्यापकाना प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे.
मान्यवरांच्या हस्ते जे.जे.महाविद्यालयाने तयार केलेल्या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. गडचिरोली येथील युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या नागपूर येथील ज्ञान फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अजिंक्य कोटावार यांना पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते ‘यंग सोशल इनोव्हेटर’ म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी संस्थेतील नेतृत्व गुण विकसन केंद्र, नाविन्यता आणि आधुनिक तंत्रज्ञान केंद्र,समानता आणि सर्वसमावेशकता केंद्र, बहुशाखीय अभ्यासक्रम अध्यापन केंद्र, ध्वनिमुद्रण कक्ष आदी विविध कक्षांना भेट देऊन कार्यप्रणालीची माहिती घेतली.