अनुसूचित जातीतील 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना
महाराष्ट्र राज्यातील सन 2020-21, या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या गुणवत्ताधारक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च व्यावसायिक शिक्षणाची पूर्व तयारी करणेकरिता; दोन वर्षांसाठी प्रती वर्षी रक्कम रुपये एक लाख रुपये संबंधित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविले आहे.
सन 2021-22 योजना अंमलबजावणी कार्यपद्धती अनुसूचित जातीतील संवर्गातील इयत्ता 10 वी पास झालेल्या होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणारा मोठा खर्च झेपवत नाही परिणामी त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते आणि विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संख्येत घट दिसून येते. त्यामुळे बार्टी मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” या नावाने इयता 10 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणा-या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याचे प्रस्तावित आहे.
योजना अंमलबजावणी कार्यपद्धती सदर योजनेकरिता पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील 10 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवत विद्यार्थी/ विद्यार्थ्यांचे पालक यांचेकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात; तसेच अर्जाचा नमुना व योजनेबाबतची माहिती सहा.आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे. बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जदार विद्यार्थी/पालक यांनी भरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा. (कार्यालयाचा पत्ता- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, 28, राणीचा बाग पुणे-411001) अर्जासोबत आई-वडील / पालकांनी द्यावयाचे स्व घोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारस पत्र सादर करणे अनिवार्य आहे. स्वयं घोषणापत्र साध्या कागदावर विद्यार्थीचे वडील यांनी सादर करावे. वडील हयात नसल्यास आईने सादर करावे. आई-वडील ह्यात नसल्यास विद्यार्थ्याच्या पालकांनी सादर करावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे / पुरावे उदा. गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या वाचनीय छायांकित प्रती साक्षांकीत करून सोबत जोडाव्यात.
योजने अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी बार्टी कार्यालय स्तरावरुन करण्यात येईल. योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल व पुढीलप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रुपये पन्नास हजार इतकी रक्कम संबंधित विद्याथ्र्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधी नुसार देण्यात येतील, त्याकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये होणाऱ्या सहामाही/वार्षिक परीक्षेत किमान 75 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून) असेही प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविले आहे.