पारंपरिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा अनेक नव्या संधी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होत आहेत : तज्ञ
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे अशा अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत ज्या पारंपरिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि आरोग्य सेवा तसेच विविध क्षेत्रांमध्ये वर्तमानकाळातील आणि भविष्यकाळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी या नव्या संधींचा वापर उपयुक्त ठरू शकेल असे मत नुकत्याच पार पडलेल्या चर्चात्मक कार्यक्रमाच्या मालिकेत तज्ञांनी व्यक्त केले.
विज्ञान प्रसार आणि विज्ञान तसेच तंत्रज्ञान संवाद विषयक राष्ट्रीय मंडळाने ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या आझादी का अमृतमहोत्सव नवीन भारत @75 या चर्चात्मक कार्यक्रमाच्या मालिकेत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा म्हणाले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांची जागा घेणार नाहीये तर विविध क्षेत्रांमध्ये नव्या संधी निर्माण करणार आहे. हे तंत्रज्ञान माहितीवर आधारित आहे आणि जर आपण आपल्या यंत्रांना उत्तम रीतीने प्रशिक्षित करू शकलो तर प्रक्रियांचे स्वयंचलिकरण करून हे तंत्रज्ञान सेकंदाच्या हजाराव्या भागाइतक्या कमी वेळात अनेक कामे करून आपल्यासाठी चमत्कार घडवून आणू शकते. कोविड-19 सह इतर अनेक आजारांच्या निदानासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो आणि जिथे पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत अशा दुर्गम भागात याचा वापर अत्यंत परिणामकारक सिध्द होईल. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचता येणे ही विविध समस्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा यशस्वीरीत्या वापर करण्याची गुरुकिल्ली आहे.”
गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत तंत्रज्ञानांच्या रोपणातून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने केलेली प्रगती तसेच येत्या काळात अत्यंत वेगाने सामोऱ्या येणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनावर आधारित अनेक योजनांची केलेली सुरुवात याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
देशापुढे असलेल्या अनेक आव्हानांवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा परिणामकारकपणे वापर करता येऊ शकतो याकडे नीती आयोगाच्या ज्येष्ठ सल्लागार अॅना रॉय यांनी निर्देश केला.
देशातील विविध समस्या ओळखून त्या सोडविण्यासाठी भारताचा भविष्यकालीन मार्गदर्शक आराखडा सुचविण्यात नीती आयोग बजावीत असलेल्या भूमिकेला त्यांनी ठळकपणे सर्वांसमोर मांडले.