On the occasion of Savitribai Phule Pune University Amrit Mahotsav organized by the university badge competition
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठातर्फे बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०२३ -२४ या वर्षात आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यासाठी अमृत महोत्सवी वर्षाचे बोधचिन्ह तयार करण्याचे प्रस्तावित होते. विद्यापीठ अधिकार मंडळाच्या सूचनेनुसार यासाठी खुली बोधचिन्ह स्पर्धा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येत आहे.
विद्यापीठाने या स्पर्धेसाठी संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध केले असून सर्व अटी व शर्थी त्यात नमूद केलेल्या आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा जनसंपर्क विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ऑफलाईन नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना दिनांक १५ जुलै ते १७ ऑगस्ट २०२३ पर्यंत नोंदणी करता येईल.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्यास रुपये ५०,००० /- पारितोषिक देण्यात येणार असून ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे सर्वांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माहितीसाठी स्पर्धकांनी pro@unipune.ac.in या मेलवर अथवा ७०२०७७८९०३ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ असून गुणवत्तापूर्ण संशोधन व शिक्षण यात विद्यापीठाचा नावलौकिक आहे. तसेच या वर्षी विद्यापीठाने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहे. या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून सर्व उपक्रमाचे नियोजन या समितीमार्फत करण्यात येणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठातर्फे बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन”