अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागाला आग; १० जणांचा मृत्यू,१ जण अत्यवस्थ.

Fire Accident Image

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागाला आग; १० जणांचा मृत्यू,१ जण अत्यवस्थ.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक – उपमुख्यमंत्री अजित पवार.
Fire Accident Image
Image by Pxfule.com

अहमदनगर: – अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. या विभागात १७ कोविड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे.

श्री.भोसले म्हणाले, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक – उपमुख्यमंत्री अजित पवार

दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील अन्य रुग्णांच्या सुरक्षिततेची व आरोग्यसेवेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *