आकाशवाणीने #एअरनेक्स्ट हा नवा उपक्रम सुरु केला.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी तरुणांनी, तरुणांसाठी चालविलेला तरुणांचा कार्यक्रम.
एका अभूतपूर्व उपक्रमाची सुरुवात करत आकाशवाणीने 28 नोव्हेंबर 2021 पासून युवा भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गायकांसाठी आपल्या स्टुडीओची दारे उघडली आहेत. येत्या 52 आठवड्यांच्या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असलेली आकाशवाणीची सर्व केंद्रे स्थानिक महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या युवकांना आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची आणि युवककेन्द्री कार्यक्रमांविषयी चर्चा करून असे कार्यक्रम सुरु करण्याच्य दिशेने मदत करण्याची संधी देणार आहे. या कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या 75 वर्षांच्या काळात आपल्या देशाने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल तसेच त्यांना विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविण्यासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा करण्यासाठी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून युवावर्ग त्यांच्या मोठ्या स्वप्नांना पंख देऊ शकेल आणि भारताचे भविष्य घडवू शकेल.
देशाच्या काना-कोपऱ्यातील भागातून सुमारे एक हजार शैक्षणिक संस्थांमधील जवळजवळ 20,000 विद्यार्थी आकाशवाणीच्या 167 केंद्रांच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होतील.
रेडीओवरून पूर्वी कधीही न ऐकले गेलेले हे आवाज आहेत आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाग म्हणून सुरु होत असलेल्या आणि #एअरनेक्स्ट हे शीर्षक असलेल्या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच आकाशवाणीवरून श्रोत्यांना ऐकवले जाणार आहेत.
देशभरातील शेकडो शैक्षणिक संस्था आणि हजारो विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणारा हा आकाशवाणीचा सर्वात मोठा एक संकल्पनाधारित कार्यक्रम असेल. #एअरनेक्स्ट हा हुशार विद्यार्थ्यांच्या शोधासाठी सुरु होत असलेला कार्यक्रम सर्व प्रमुख भारतीय भाषा आणि बोली भाषांमध्ये प्रसारित केला जाईल.