माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आधार- 2 डिजिटल ओळखीच्या नव्या युगाचा आरंभ आणि स्मार्ट प्रशासन या कार्यशाळेचे उद्घाटन.
आधारने लोकांच्या , मुख्यत्वे तळागाळातील लाखो लोकांच्या आयुष्यात मूलभूत बदल घडवून आणला : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज आधार 2 डिजिटल ओळखीच्या नव्या युगाचा आरंभ आणि स्मार्ट प्रशासन या कार्यशाळेचे उद्घाटन केले. ही कार्यशाळा 23 नोव्हेंबर 2021 पासून विज्ञान भवन नवी दिल्ली येथे सुरू होत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सोहनी, UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गर्ग तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक मान्यवरांची या कार्यशाळेला थेट उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की आधारने लाखो लोकांच्या आयुष्यात मूलभूत बदल घडवून आणला , विशेषतः तळाशी असलेल्या लोकांच्या आयुष्यात. याशिवाय सरकारी कार्यक्रम ज्या पद्धतीने राबविण्यात येत होते त्या पद्धतीत सुद्धा आधारमुळे अमुलाग्र बदल घडून आला.
यावेळी बोलताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अजय प्रकाश सोहनी म्हणाले की आधारमुळे काहीही ओळख नसलेल्या अनेक लोकांना स्वतःची ओळख मिळाली.
UIDAI चे माजी अध्यक्ष नंदन निलकेणी यांनी पाठवलेल्या व्हर्चुअल संदेशात त्यांनी स्पष्ट केलेल्या आधार संदर्भातील संकल्पना आणि संदेश यावेळी ऐकवण्यात आला.
ज्या संकल्पनांवर चर्चा घडवून आणता येतील अशा तीन संकल्पना नंदन निलकेणी यांनी अधोरेखित केल्या.
यामध्ये इलेक्ट्रिकल ग्रीड व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यात आधारची भूमिका स्पष्ट करणारी संकल्पना, जंगलातील रहिवाशांना देता येऊ शकेल अशी थेट लाभ हस्तांतरण योजना आणि सामाजिक सुरक्षा प्रदान योजना यांचा समावेश होता. इलेक्ट्रिकल ग्रीड योजनेत बदल घडवून आणणाऱ्या संकल्पनेनुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जाऊन त्यामार्फत वितरण कंपन्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षमता प्रदान करता येईल तर जैववैविध्य आणि जंगले यांच्या संवर्धनासाठी तसेच संगोपनासाठी वनातील रहिवाशांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रोत्साहन देता येईल. आधार मुळे सामाजिक सुरक्षेची व्यवस्थाही प्रत्यक्षात आणता येऊ शकेल.