नव्या युगातील तंत्रज्ञानाची वाढती मागणी लक्षात घेऊन आयआयटी रुरकीने सात नवे शैक्षणिक कार्यक्रम केले सुरु.
येत्या काळात नवयुगीन तंत्रज्ञानाला येणारी वाढती मागणी लक्षात घेऊन रुरकी येथील आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेने माहितीशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील विशेषज्ञता मिळविण्यासह अभियांत्रिकी, स्थापत्यकला, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या निवडक विषयांतील नवे ज्ञान संपादन करण्यासाठी सात नवे शैक्षणिक कार्यक्रम सुरु केले आहेत.
या नव्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थी तसेच कार्यरत व्यावसायिकांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये मूल्यवर्धन करण्यास मदत होईल अशी आशा केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी संबंधित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. देशातील सर्वात ज्येष्ठ तंत्रज्ञानविषयक शिक्षण देणाऱ्या आयआयटी या संस्थेत 30 जुलै 2021 रोजी झालेल्या कार्यक्रमात नव्या शैक्षणिक कार्यक्रमांचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, “अशा प्रकारचे नवे उपक्रम संबधित क्षेत्रातील नेत्यांना अनुयायांपासून ठळकपणे वेगळे अस्तित्व देतात. या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यांच्यामागची तात्विक बैठक जाणून घेतल्यानंतर मी खूप आनंदित झालो आहे.”
विद्यमान शैक्षणिक वर्षाच्या (2021-22) हिवाळी सत्रात सुरु होणार असलेल्या या नव्या कार्यक्रमांमध्ये सहा पदवीपश्चात पदवी अभ्यासक्रम आणि एका पंचवार्षिक एकात्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे. आजच्या काळातील परिस्थितीमध्ये अधिकाधिक रित्या समर्पक ठरणाऱ्या नव्या आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने हे नवे शैक्षणिक कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत.