राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून आयुष्मान भारत पीएम- जनऔषधी योजनेच्या आरोग्य लाभ पॅकेजमध्ये सुधारणा.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (एबी पीएम- जेएवाय) या योजनेची अंमलबजावणी करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या आरोग्य लाभ पॅकेजमध्ये सुधारणा केल्या आहेत.
या सुधारित आरोग्य लाभ पॅकेज (एचबीपी 2.2) मध्ये काही आरोग्य पॅकेजच्या दरांमध्ये 20 टक्क्यांवरून 400 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सुमारे 400 प्रक्रिया दरांमध्ये सुधारणा करण्यात आली असून काळी बुरशी या आजाराशी संबंधित एका नव्या अतिरिक्त वैद्यकीय व्यवस्थापन पॅकेजचा त्यात समावेश करण्यात आला आहे. एचबीपी 2.2 ची सुरुवात नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात येईल.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीया यांनी या सुधारणांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एचबीपी 2.2 च्या सुधारित आवृत्तीमुळे या योजनेच्या पॅनेलमधील रुग्णालयांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनऔषधी योजनेच्या लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले. ऑन्कोलॉजीसाठी सुधारित पॅकेजमुळे देशभरातील कर्करुग्णांना अधिक फायदे मिळतील, अशी अपेक्षा मांडवीया यांनी व्यक्त केली. काळी बुरशी आजाराशी संबंधित नव्या अतिरिक्त पॅकेजमुळे या रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळेल. अधिक तर्कसंगत आरोग्य लाभ पॅकेजमुळे खाजगी रुग्णालयांमध्ये ही योजना चांगल्या प्रकारे राबवता येईल आणि रुग्णांच्या उपचारांवरील अतिरिक्त खर्चामध्ये कपात व्हायला मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.
एनएचएने खालील श्रेणींसाठी दरांमध्ये सुधारणा केली आहे :
- रेडीएशन ऑन्कॉलॉजी प्रक्रिया,
- डेंग्यू, ऍक्युट फेब्राईल आजार इ. सारख्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रक्रिया.,
- काळ्या बुरशीवरील उपचारांसाठी सर्जिकल पॅकेज,
- उजवी/डावी हृदय कॅथेटरायजेशन प्रक्रिया, पीडीए क्लोजर, आर्थ्रोडेसिस, कोलेसिस्टेक्टॉमी, ऍपेन्डीसेक्टोमी इत्यादी.