आरोग्यमंत्र्यांनी सरपंचांना कोविड लसीकरण मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोविड लसीकरण मोहिमेत सरपंचांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जालन्यात बोलताना ते म्हणाले की, सरपंच हे गावपातळीवरील लोकप्रतिनिधी असून त्यांच्या सहकार्याशिवाय लसीकरणाला गती मिळू शकत नाही.
राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लादले जाणार नसल्याचा पुनरुच्चार आरोग्यमंत्र्यांनी केला.
दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत नागरिकांकडून सहकार्य न मिळाल्यास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. नागरिकांकडून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, सुमारे 38 ते 40 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.
लसीकरणासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याला नागरिकांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.