केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आर्थिक विकासासाठी आधुनिक आणि उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याच्या महत्त्वावर दिला भर.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशाचा आर्थिक विकास करून रोजगार संधींची निर्मिती करण्यासाठी आधुनिक आणि उच्च दर्जाच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केलेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी ते गुजरातच्या भडोच विभागात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. ते म्हणाले की द्रुतगती महामार्गामुळे केवळ दिल्ली आणि मुंबई यांच्यामधीलच नव्हे तर इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानच्या प्रवासाला लागणाऱ्या वेळात देखील कपात होणार आहे. गडकरी म्हणाले की, गुजरातमध्ये 35,100 कोटी रुपये खर्चून 423 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निर्मितीचे काम सुरु आहे. त्यांनी सांगितले की या द्रुतगती महामार्गावर, गुजरातमध्ये 60 मोठ्या आकाराचे पूल, रस्त्यांतर्गत अदलाबदल शक्य करणारी 17 केंद्रे, 17 उड्डाणपूल आणि 8 रस्त्यांवरील पुलांचे बांधकाम होणार आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की या द्रुतगती महामार्गावर जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राज्यात रोजगार संधींची निर्मिती करण्यासाठी 33 ठिकाणी मार्गालगत सुविधा केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन आहे.
या भेटीदरम्यान ज्या ठिकाणी फेब्रुवारी 2021 मध्ये एका दिवसात सर्वात वेगाने रस्ते बांधणीचा जागतिक विक्रम करण्यात आला त्या जागेचे विक्रम गडकरी यांनी परीक्षण केले. तसेच त्यांनी भडोचजवळ नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पुलाला देखील भेट देऊन पाहणी केली. 2 किलोमीटर लांबीचा एक्स्ट्रॉडॉज्ड केबल स्पॅन प्रकारचा हा पूल, द्रुतगती महामार्गावर बांधण्यात येणारा भारतातील पहिला 8 मार्गिका असलेला पूल असेल.
भडोच जवळील रस्त्यांतर्गत अदलाबदल शक्य करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण केंद्रासह, हा प्रकल्प देशातील द्रुतगती महामार्गांच्या विकासाचा चेहरा-मोहरा बनून जाईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मध्य प्रदेशात 9577 कोटी रुपये खर्चाच्या 1356 किलोमीटर लांबीच्या 34 रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले.