Netaji Subhas Chandra Bose’s grand statue to be installed at India Gate says PM.
इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार : पंतप्रधान.
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र यांचा पुतळा घडविण्याचे काम सुरु आहे. म्हणून नेताजीच्या जयंती दिनी 23 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान, याच पुतळ्याचा त्रिमित परिणाम साधणाऱ्या होलोग्रामचे अनावरण करणार आहेत.
ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत असताना, मला हे सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाईटमध्ये घडविलेला भव्य पुतळा नवी दिल्ली येथील इंडिया गेट परिसरात उभारण्यात येणार आहे. भारतावर त्यांच्या कार्याचे जे कायमचे ऋण आहे त्याचे हे एक प्रतीक असेल.
नेताजींचा हा भव्य पुतळा घडवून तयार होईपर्यंत, इंडिया गेट परिसरात त्याच ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचा त्रिमित परिणाम साधणारे होलोग्राम बसविण्यात येईल. मी नेताजींच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला या होलोग्रामचे अनावरण करीन.”