इथेनॉल मिश्रणामुळे उत्सर्जन आणि परकीय चलनाची बचत.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लिखित उत्तराद्वारे राज्य सभेत सांगितले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाअंतर्गत सरकारी तेल विपणन कंपन्या (OMCs) ई10 (10% इथेनॉल असलेले पेट्रोल)ची उपलब्धतेनुसार विक्री करत आहेत. सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (ESY) 2020-21 साठी OMCs नी 1 डिसेंबर 2020 ते 14 नोव्हेंबर 2021 या काळात 3672.46 कोटी लिटर इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री केली आहे.
भारतीय तेल महामंडळ मर्या., (IOCL) आणि भारतीय वाहनविषयक संशोधन संघटना(ARAI) तसेच भारतीय वाहन निर्माता संघ (SIAM) यांनी ई10 या इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराचा सध्याच्या वाहनांवरील परिणाम तपासण्यासाठी संयुक्त अभ्यास कार्यक्रम राबविला. त्यातून असा निष्कर्ष हाती आला की दुचाकी आणि कारच्या बाबतीत ई10 या इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे शुद्ध पेट्रोलच्या वापरापेक्षा हायड्रोकार्बन आणि कार्बनचे उत्सर्जन 20% नि कमी झाले. आणखी एका अभ्यास प्रकल्पातून असे दिसून आले की, ई10 या इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे दुचाकींच्या कार्बन मोनोक्साईड उत्सर्जनात 50% घट झाली तर चारचाकींच्या कार्बन मोनोक्साईड उत्सर्जनात 30% घट झाली. प्रतीकात्मक परकीय चलन परिणाम हा पेट्रोलचा सरासरी फ्री ऑन बोर्ड दर आणि डॉलर/भारतीय रुपया विनिमय दर यांचा घटक आहे. विद्यमान इथेनॉल पुरवठा वर्ष 2020-21 मध्ये 1 डिसेंबर 2020 ते 14 नोव्हेंबर 2021 या काळात प्रतीकात्मक परकीय चलन परिणाम सुमारे 9580 कोटी रुपये आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले आहे की, देशातील सध्याची अल्कोहोल/इथेनॉल ऊर्ध्वपातन क्षमता सुमारे 722 कोटी लिटर्स प्रतिवर्ष इतकी आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम आणि इतर क्षेत्रांसाठीची इथेनॉलची गरज लक्षात घेऊन ही क्षमता अंदाजित 1500 लिटर प्रतिवर्ष इतकी वाढविण्यात येत आहे.