इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गोलमेज.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने (एमएचआय) 4 डिसेंबर 2021 रोजी गोव्यात गोलमेज आयोजित केली आहे. विविध राज्यांचे परिवहन मंत्री आणि मुख्य
सचिव/वरिष्ठ अधिकारी, स्वयंचलीत यंत्र (ऑटोमोटिव्ह) क्षेत्रातील उद्योग, नवउद्यम (स्टार्ट अप्स) आणि तंत्रज्ञांना गोलमेजमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे प्रमुख पाहुणे आहेत आणि अवजड उद्योग राज्यमंत्री श्री कृष्ण पाल, गुर्जर सन्माननीय अतिथी आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत बीजभाषण करणार आहेत.
पार्श्वभूमी
वाहन उद्योग क्षेत्र हे भारताच्या आर्थिक वाढीचा प्रमुख आधार असून आहे ते उत्पादन निर्मिती क्षेत्रात सर्वात मोठे योगदान देत आहे. वाहन उद्योग, भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी मध्ये) जवळपास 6.4 टक्के आणि उत्पादन निर्मिती क्षेत्राच्या जीडीपीमध्ये 35 टक्के योगदान देतो. रोजगार देणारे हे एक आघाडीचे क्षेत्र आहे.
दुचाकी, तीनचाकी आणि ट्रॅक्टर उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय मूळ उपकरण निर्मितीचा (ओईएम) आकार 80.8 अब्ज अमेरीकी डॉलर्स असून 11.7 अब्ज अमेरीकी डॉलर्स इतकी निर्यात आहे. वाहनांच्या घटकभाग उद्योगाचा आकार 57 अब्ज अमेरीकी डॉलर्स आहे. यात 15 अब्ज अमेरीकी डॉलर्स निर्यात आणि 17.7 अब्ज अमेरीकी डॉलर्सची आयात आहे. मूल्याच्या दृष्टीने, भारतीय स्वयंचलीत यंत्र (ऑटोमोटिव्ह) उद्योग जगात 11 व्या क्रमांकावर आहे. प्रगत/स्वयंचलीत यंत्र (ऑटोमोटिव्ह) घटकांमध्ये भारताचा वाटा जागतिक स्तरावर 18 टक्क्यांच्या तुलनेत केवळ 3 टक्के आहे जो 2030 पर्यंत 30 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
कोविड महामारीनंतर जगात, हवामान बदलावर नव्याने जोर देण्यासोबतच, जागतिक स्वयंचलीत यंत्र (ऑटोमोटिव्ह) परिदृष्यात मोठे बदल घडत आहेत. भविष्यातील तंत्रज्ञानाला मोठी चालना देण्यासह शून्य उत्सर्जन असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि आयात तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांनांच्या वापराला गती देण्यासाठी चालना देत आहे आणि ते साध्य करण्याकरता अनेक धोरणे राबवत आहे.
4 डिसेंबर 2021 रोजी गोलमेज
गोव्यात 4 डिसेंबर 2021 रोजी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश, ऑटो ओईएमचे प्रमुख आणि स्वयंचलीत यंत्र (ऑटोमोटिव्ह) घटक उत्पादक, बॅटरी साठवणूक (स्टोरेज) उद्योजक, नवउद्यम (स्टार्ट अप) आणि तांत्रिक विषयक तज्ञांना एकत्र आणण्यासाठी आणि रणनीती तयार करण्यासाठी गोव्यात गोलमेज आयोजित केली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि भारतात ईव्ही, बॅटरी आणि उच्च तंत्रज्ञान ऑटोमोटिव्ह घटकांच्या निर्मितीमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे हा यामागचा उद्देश आहे.