उदया मुंबईत “महामार्ग, परिवहन आणि लॉजीस्टीक्समध्ये गुंतवणुकीच्या संधी” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उदया मुंबईत “महामार्ग, परिवहन आणि लॉजीस्टीक्समध्ये गुंतवणुकीच्या संधी” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या, 17 डिसेंबर 2021 रोजी, मुंबई येथे होणाऱ्या “महामार्ग, परिवहन आणि लॉजीस्टीक्समध्ये गुंतवणुकीच्या संधी” या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.

Shri Nitin Gadkari
Shri Nitin Gadkari
File Photo

केंद्र आणि राज्य सरकारची विविध मंत्रालये, विविध संस्था आणि खाजगी क्षेत्राच्या परस्पर सहकार्यावर भर देऊन पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने तयार झालेल्या पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय बृहद् आराखडयाद्वारे, भारताच्या लॉजिस्टीक क्षेत्राला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, भारतमाला प्रकल्प,मालमत्ता चलनीकरण आणि जुन्या वाहनांची शास्त्रीय विल्हेवाट लावण्याचे  धोरण या तीन मध्यवर्ती संकल्पना केंद्र स्थानी ठेऊन, महामार्ग, परिवहन आणि लॉजिस्टिक्समध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतमाला प्रकल्प हा राष्ट्रीय महामार्ग विकासाचा पथदर्शी कार्यक्रम आहे. यात बहु-वाहतूक साधने असलेले लॉजीस्टिक्स पार्क्स, विविध वाहतूक साधनांची एकत्रित स्थानके, रोप वे, ऑप्टिकल फायबर पायाभूत सुविधा यांसह मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूकीची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला आहे.

संपत्ती चलनीकरणावरील चर्चेद्वारे, आर्थिक वर्ष 25 पर्यंत 6 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे चलनीकरण करण्याची सरकारची योजना आहे. नोंदणीकृत वाहन विल्हेवाट सुविधा आणि स्वयंचलित चाचणी केंद्र (ATS) स्थापन करून प्रदूषणकारी आणि भंगारात निघालेल्या वाहनांना बाद करण्याची भक्कम व्यवस्था उभी करणे, हा वाहन विल्हेवाट धोरणावर गुंतवणूकदरांशी संवाद साधण्यामागचा उद्देश आहे. या परिषदेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हाती घेतलेले जोजिला बोगदा, बहुआयामी लॉजीस्टिक पार्क आणि इतर अनेक प्रकल्प संबधितांसमोर आणण्याची योजना आहे.

या परिषदेला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अध्यक्ष गिरिधर अरमाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षा अलका उपाध्याय, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा, महाराष्ट्र सरकारच्या वाहतूक विभागाचे प्रधान सचिव आशीष कुमार सिंह, यांच्यासह संभाव्य गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ उपस्थित राहणार आहेत

परिषदेचे आयोजन करतांना कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *