उद्योगस्नेही आणि पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने संबंधित धोरणांची पुनर्रचना करून उद्योगाला पाठबळ देण्यात सरकार आघाडीवर – नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, उद्योगस्नेही आणि त्रास मुक्त असे पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने धोरणांची पुनर्रचना करून उद्योगांना पाठबळ देण्यात सरकार आघाडीवर आहे.”रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी व्यवसाय सुलभता” या विषयावरील वेबिनारला संबोधित करताना ते म्हणाले की,महामारीमुळे लोकांचे आरोग्य आणि राष्ट्राची अर्थव्यवस्था या दोन्ही बाबतीत आपण अतिशय आव्हानात्मक काळातून जात आहोत.
चांगल्या प्रकारे विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचे अनेक फायदे आहेत, हे फायदे प्रथम,आर्थिक व्यवहारांचा स्तर वाढवतात, शासनाचा महसूली पाया सुधारतात आणि शेवटी,उत्पादक क्षेत्रांवर केंद्रित खर्च सुनिश्चित करतात असे श्री. गडकरी यांनी सांगितले. कोविड -19 महामारीमुळे भारतात विकसाचा वेग संथ होता मात्र सर्व क्षेत्रातील सरकारच्या आश्वासक धोरणांमुळे आणि सर्व भागधारकांच्या वचनबद्धतेमुळे 2021-22 च्या पहिल्या तिमाही मध्ये भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 20.1% या विक्रमी उच्चांकावर पोहोचला,असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, 2025 पर्यंत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने, सरकारने 1.4 ट्रिलियन डॉलर्स निधीची तरतूद करून अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली आहे.
श्री. गडकरी यांनी सांगितले की, देशातील सर्वांगीण आणि एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी.’गतीशक्ती’ योजनेचा राष्ट्रीय बृहत आराखडा 100 लाख कोटीं रुपयांपेक्षा अधिक आहे. ते म्हणाले की, गतीशक्ती योजनेचा बृहत आराखडा राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन कार्यक्रमाची रूपरेषा प्रदान करेल आणि रसद खर्च कमी करून पुरवठा साखळी सुधारून भारतीय उत्पादनांना अधिक स्पर्धात्मक बनवण्याचा उद्देश आहे.भारतातील महामार्ग क्षेत्र कामगिरीत आणि नवोन्मेषात आघाडीवर आहे आणि सरकारने खाजगी विकासकांच्या स्वारस्याचे नूतनीकरण करून देशातील रस्ते बांधणीला गती देण्यासाठी अनेक प्रकल्प यशस्वीपणे आणले आहेत.