An investment of Rs 20,000 crore is proposed to create around 10,000 jobs
उद्योग विभागाचा रिन्यु पॉवरसोबत सामंजस्य करार
२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित सुमारे दहा हजार रोजगार निर्मिती
नविनीकरण (रिन्यूएबल) ऊर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी राज्याचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) ऊर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज सह्याद्री अतिथीगृह येथे मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्या वतीने डॉ.अमित पैठणकर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. त्याचप्रमाणे इथे आलेले अनेक प्रकल्प अल्पावधीतच मोठे झाले आहेत. कारण उद्योग वाढीसाठी लागणारे पूरक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. आर्थिक परिस्थिती कोविड काळातही स्थिर होती. रिन्यु पॉवर या कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प हा नागपुरात येत असल्याने विशेष सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या प्रयत्नाने होत असलेल्या या सामंजस्य कराराचे विशेष स्वागत केले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नविनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचा विश्वास श्री. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
या कराराच्या माध्यमातून राज्यात होत असलेली गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासंदर्भात प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी माहिती दिली. तर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित सुमारे दहा हजार रोजगार निर्मिती
मे. रिन्यू पॉवर लि., दिल्ली या घटकामार्फत १० गिगावॅट मेटालर्जिकल ग्रेड सिलिका, १० गिगावॅट पॉलिसिलीकॉन, ६ गिगावॅट इनगॉट/वेफर निर्मिती सुविधा आणि १ गिगावॅट मॉड्युल निर्मितीची सुविधा नविकरणीय ऊर्जा ब्लॉकसह एकात्मिक प्रकल्प स्थापित करणार आहे.
हा प्रकल्प नागपूर येथे स्थापित होणे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प सुमारे ५०० एकर जागेवर स्थापित होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पात २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८,००० ते १०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित असलेल्या उद्योगांच्या (Ancillary Unit) माध्यमातून रु. २००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक होणार आहे.
आज उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री श्री.सामंत यांच्या उपस्थितीत स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest- EoI) करण्यात आला आहे.
मे. रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्या वतीने समूह अध्यक्ष डॉ. अमित पैठणकर व राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव उद्योग डॉ.हर्षदीप कांबळे यांनी स्वारस्य अभिव्यक्तीवर Expression of Interest (EoI) स्वाक्षरी केली.
यावेळी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मलिकनेर, मे. रिन्यू पॉवर प्रा. लि.चे प्रमुख तांत्रिक अधिकारी सर्वनंट सेण्ट, मुख्य कार्यकारी अधिकारी मार्कम सिकमोक उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com