Entrepreneurship Yatra to promote entrepreneurship, micro business and youth training
उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा
कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुंबईत झाला यात्रेचा प्रारंभ
४० हजारहून अधिक युवक-युवतींना मिळणार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रशिक्षण
मुंबई : राज्यात उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री श्री. राजेश टोपे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.
युथ एड फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राज्यातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 40 दिवस सुमारे 4 हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे. यात्रेमध्ये 40 उद्योजकता प्रशिक्षक सहभागी होणार असून हे प्रशिक्षक सुमारे 40 हजारहून अधिक युवकांना भेटतील, त्यांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देतील.
त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांमध्ये उद्योजकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे उद्योगाच्या नवनव्या संकल्पना आहेत अशा युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. युवकांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम यात्रेदरम्यान राबविण्यात येतील.
प्रत्येक जिल्ह्यात 3 दिवसांच्या उद्योजकता प्रशिक्षणाचा कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व 36 जिल्ह्यामध्ये डिसेंबरअखेर 4 हजार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी विपणन सहाय्य प्रदान करण्याबरोबरच संबंधीत युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शक्य असेल त्या सरकारी योजनांशी जोडण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.
कौशल्य विकासातून शाश्वत विकासाला चालना
मंत्री श्री. टोपे याप्रसंगी म्हणाले की, राज्यातील युवकांमध्ये नवनवीन संकल्पना आहेत, स्टार्टअप्सचा विकास, सूक्ष्म व्यवसाय, लघुउद्योग यांना चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आज सुरू झालेल्या उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या अशा विविध योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील युवक-युवतींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. युवकांचा कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या स्टार्टअपचा विकास या माध्यमातूनच राज्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे, असे मंत्री श्री. टोपे म्हणाले.
उद्यमिता यात्रेचा आज प्रारंभ झाला असून पालघर, वसई, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या मार्गे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून जनजागृती करत ही यात्रा प्रवास करणार आहे. 20 जून रोजी पुणे येथे यात्रेचा समारोप होणार आहे.
हडपसर न्युज ब्युरो