उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथील विविध उपक्रमांचे उद्घाटन संपन्न.
बारामती तालुका दूध उत्पादक संघाच्यावतीने खंडोबानगर येथील पेट्रोल पंप, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम, नंदन मिल्क पार्लर व टोरेंट गॅसच्या नंदन पेट्रोलियम सीएनजी स्टेशनचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, बारामती पंचायत समिती सभापती नीती फरांदे, एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात, टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालक श्रीधर तांब्रपाणी, बारामती दूध संघाचे उपध्यक्ष राजेंद्र रायकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन ढोपे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.पवार म्हणाले, बारामती दूध संघाने सुरू केलेले पेट्रोल पंप, टोरेंट गॅसचा सीएनजी प्रकल्प, नंदन डेअरी मिल्क पार्लर हे चांगले उपक्रम असून याच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल. याठिकाणी ग्राहकाला चांगल्या सुविधा आणि कमीत कमी वेळेत सेवा मिळणे आवश्यक आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन याठिकाणी इलेक्ट्रीक चार्जींगची सोय करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली.
सीएनजी हा पेट्रोल व डिझेलला एक स्वस्त आणि स्वच्छ पर्याय आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घेणे आवश्यक आहे. सीएनजीची व्यापक उपलब्धता आणि लक्षणीय बचत ग्राहकांना वापर करण्यास प्रोत्साहित करीत असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी श्री.तांब्रपाणी यांनी टोरेंटो गॅस विषयीची माहिती दिली.