उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका
पुणे : पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज करावयाचे आहेत.
दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षित नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.
अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. धनाकर्ष (डीडी) ‘डेप्युटी आरटीओ पिंपरी चिंचवड’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेचा पुणे येथील असावा. अर्जासोबत अर्जदाराने त्याचे छायाचित्र असलेले ओळखपत्र देणे आवश्यक आहे.
चारचाकीची यादी ७ डिसेंबर रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा.
त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.
दुचाकीची यादी ८ डिसेंबर रोजी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा धनाकर्ष जमा करावयाचा असेल तर त्यांनी ८ डिसेंबर रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा.
त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असले त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रदद होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, परत केली जाणार नाही, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.