‘उमंग(UMANG) ऍप’ मध्ये नकाशांची सुविधा सुरू.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘उमंग(UMANG) ऍप’ मध्ये नकाशांची सुविधा सुरू, MapmyIndia बरोबर सामंजस्य करार संपन्न.
भौगोलिक दृष्ट्या जवळपास असणाऱ्या मंडया, रक्तपेढ्या अशा सरकारी सेवासुविधा शोधून काढणे या सुविधेमुळे लोकांना होणार शक्य.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘उमंग(UMANG) ऍप’ मध्ये नकाशांची सुविधा सुरू केली आहे. यासाठी मंत्रालयाने मॅपमायइंडिया अर्थात MapmyIndia बरोबर सामंजस्य करार केला आहे.
यामुळे आता भौगोलिक दृष्ट्या जवळपास असणाऱ्या मंडया, रक्तपेढ्या अशा अनेक सरकारी सेवासुविधा केवळ एका बटणाच्या क्लिकवर शोधून काढणे नागरिकांना शक्य होणार आहे. मॅपमायइंडियाने गल्लीबोळ आणि गावपातळीपर्यंत सर्व बारकाव्यांनिशी तयार केलेल्या व नकाशावाचन करणाऱ्याशी संवाद साधणाऱ्या तपशीलवार नकाशांवर या सुविधा पाहता येणार आहेत. ईप्सित ठिकाणापर्यंतचे अंतर, दिशादर्शन, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणाऱ्या सूचना ऐकू येणे व दृश्यात्मक मार्गदर्शन हेही यामध्ये शक्य होणार आहे. तसेच रहदारी आणि रस्ते-सुरक्षाविषयक सूचनाही यामध्ये मिळू शकणार आहेत. अशाप्रकारे उमंग ऍपशी मॅपमायइंडिया जोडले गेल्याने नागरिकांची मोठीच सोय होऊ शकणार आहे.
पुढील सेवांसाठी उमंग ऍपने यापूर्वीच मॅपमायइंडियाच्या माध्यमातून पुढील बाबतींत नकाशा सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे -:
- मेरा राशन/ रेशन – मॅपमायइंडियाच्या नकाशावर स्वस्त धान्य दुकाने पॉइंटर स्वरूपात दाखवलेली असल्याने, उमंगच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या सर्वात जवळच्या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी दिशा कळू शकतात.
- इ- नाम – उमंगच्या माध्यमातून वापरकर्त्याना ‘माझ्याजवळची मंडई / मंडी/ घाऊक बाजारपेठ’ ही सुविधा मिळत असल्याने नकाशावरील पॉइंटरच्या मदतीने दिशा समजून तिचे ठिकाण नेमकेपणाने समजण्यास मदत होणार आहे.
- दामिनी- ‘विजांच्या लखलखाटासंबंधी धोक्याची पूर्वसूचना’ देणाऱ्या या सुविधेमुळे वापरकर्त्यांना काही मिनिटांपूर्वी वीज कोसळलेल्या जवळपासच्या भागाची दृश्यस्वरूपात माहिती मिळू शकते. पूर्वसूचना देणाऱ्या या यंत्रणेमुळे वीज पडणाऱ्या संभाव्य ठिकाणाची माहिती नकाशावर दिसू शकते.
नागरिकांना अधिक उपयुक्त ठरण्यासाठी ही नकाशा-सुविधा पुढील आणखी काही सेवांसाठीही सुरु करण्यात येणार आहे-:
- ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळ- वापरकर्त्यांना ईएसआयसीची रुग्णालये/ दवाखाने वगैरे केंद्रे नकाशावर दिसून दिशा समजणे शक्य होईल.
- इंडियन ऑइल- जवळचे गॅसस्टेशन तसेच इंधन भरणा स्थानक- किरकोळ स्थानक तसेच वितरक दोन्ही- नकाशावर समजणे शक्य होईल.
- एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण- प्रवासादरम्यान पथकर नाके आणि पथकराचे दर समजण्यासाठी मदत होईल.
- एनसीआरबी अर्थात- राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था- जवळपास असणाऱ्या पोलीस ठाण्याची माहिती व ठिकाण नकाशावर मिळू शकेल.
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (मेरी सडक)- सदर योजनेतील खराब रस्त्यांविषयीच्या तक्रारी नोंदवायचा असल्यास, मॅपमायइंडियाच्या मंचावरून तो विशिष्ट रस्ता निवडून तक्रार करणे शक्य होईल.
उमंग (UMANG) ऍप डाउनलोड करण्यासाठी 97183-97183 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. तसेच पुढील लिंक्सवरूनही हे ऍप डाउनलोड करता येईल-
1. Web: https://web.umang.gov.in/web/#/
2.Android: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c