इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘एआय पे चर्चा ‘ ने सुशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या महत्वावर दिला भर.
प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास उत्तम धोरणे आखण्यात आणि आव्हानांचा आधीच अंदाज वर्तवण्यास मदत होऊ शकते. या विचारावर लक्ष केंद्रित करून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाने (NeGD) नुकतेच एआय पे चर्चा (AI डायलॉग) आयोजित केली, ज्यामध्ये पॅनेलवरच्या नामवंत सदस्यांनी जागतिक सर्वोत्तम पद्धतीबरोबरच डेटा-प्रणित आणि कृत्रिम बुद्धिमत्ता -सक्षम प्रशासनाच्या महत्त्वावर चर्चा केली.
आपल्या प्रारंभिक भाषणात राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग म्हणाले की आरोग्यसेवा, कृषी, कौशल्य, उत्पादन इत्यादी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर जगभरात मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यात आला आहे. “असे उपाय अधिक सर्वव्यापी होतात आणि लोकांना त्याचा अधिकाधिक फायदा होतो,” असे ते म्हणाले .
सत्रातील प्रमुख वक्ते डॉ. मार्टिन क्लेन, ग्लोबल जनरल मॅनेजर, पब्लिक सर्व्हिसेस, SAP, वॉलडॉर्फ, जर्मनी, यांनी सार्वजनिक क्षेत्र, संरक्षण आणि सुरक्षा, टपाल सेवा, भविष्यातील शहरांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत विचार मांडले. ते म्हणाले की जगभरात भरपूर माहिती उपलब्ध असल्यामुळे उत्तम प्रशासन आणि प्रक्रियेसाठी योग्य माहितीचा वापर करणे अत्यावश्यक आहे. “एआय-प्रणित प्रशासन आपल्याला आव्हानांचा अंदाज लावण्यास सक्षम बनवते आणि अशी आव्हाने रोखण्याची क्षमता आपल्याला देते. आपल्याला सक्रियपणे कृती करण्यासाठी, नागरिक-स्नेही धोरणे आखण्यासाठी आणि आपली एकूण कामकाज प्रक्रिया उंचावण्यासाठी मदत करते,” असे त्यांनी सांगितले.
SAP आर्टिफिशियल इंटेलिजेंस फाऊंडेशन इंडियाचे प्रमुख आणि अभियांत्रिकीचे वरिष्ठ संचालक राहुल लोढे यांनी कोविड-19 सिटी-स्केल सिम्युलेटर आणि लॉजिस्टिक मॉडेलिंग, सरकारी संसाधन नियोजन प्रणाली आणि इंटेलिजेंट अकाउंटिंग ऑटोमेशनसाठी- मशीन लर्निंगचा वापर करून इनव्हॉइस, पावती, खाते समन्वय यासाठी कॉम्प्लेक्स डॉक्युमेंट एक्सट्रॅक्शन यांसारख्या एआय आधारित उपायांचे सादरीकरण आणि प्रात्यक्षिक दाखवले.