Forest tourism should be implemented in the Ekvira Devasthan area: Legislative Council Deputy Speaker Dr Neelam Gorhe
एकविरा देवस्थान परिसरात वनपर्यटन राबविण्यात यावे: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.
पुणे : एकविरा देवस्थान तसेच लेण्याद्री देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आराखड्यानुसार कामांना गती द्यावी तसेच एकविरा देवस्थान परिसरात भांबुर्डा वनविहाराच्या धर्तीवर वनपर्यटन राबविणे शक्य असून त्यादृष्टीने वनविभागाने आराखडा करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
एकविरा आई मंदिर देवस्थान तसेच लेण्याद्री देवस्थानच्या सर्वांगीण विकास आराखड्याबाबत आढावा बैठक डॉ. गोऱ्हे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे यांनी घेतली.
देवस्थानांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातून एकविरा आई मंदिर देवस्थान तसेच लेण्याद्री देवस्थानसह जिल्ह्यातील देवस्थानांचा उत्तम पद्धतीने विकास करण्यात यावा. विश्वस्त आणि प्रशासनात चांगला समन्वय साधून एकविरा आई देवस्थान विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. तीर्थक्षेत्रांच्या परिसरात वनपर्यटन आणि कृषीपर्यटनावर अधिक भर दिल्यास परिसरात रोजगाराच्या संधी वाढण्यासह विकासाला चालना मिळेल.
लेण्याद्री देवस्थान येथे प्रशासन आणि विश्वस्त यांनी समन्वयाने काम सुरू केले आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. प्रकल्प तसेच पथदिव्यांचे काम सुरू असून त्याला गती द्यावी. तसेच सीसीटीव्ही आणि मंदिरातील चांगली प्रकाश योजना बाबतही समन्वयाने आराखडा करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.