एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना ३० व ३१ ऑक्टोबरला लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा.
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करावा लागणार असून त्यांना 30 व 31 ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षेसाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
त्याचप्रमाणे ‘एम एस इनोव्हेटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ हेही एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असल्याने त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरिता प्रवास करण्याची मुभा द्यावी तसेच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.