एलएनजी परिवहन क्षेत्रात क्रांती घडवेल – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन.
भारतातील पहिल्या खाजगी एलएनजी फॅसिलिटी प्लांटचे नागपुरात गडकरींच्या हस्ते उद्घाटन.
र्नैसर्गिक द्रवरूप वायू – एलएनजी हे स्वच्छ इंधन असून पेट्रोल व डिझेलप्रमाणे ते प्रदूषण करत नाही. स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या एलएनजीमुळे इंधन खर्चात बचत होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एलएनजी भविष्यातले इंधन असून परिवहन क्षेत्रात ते क्रांती घडवेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. बैद्यनाथ आयुर्वेदिक समूहातर्फे पहिला खाजगी एलएनजी फॅसिलिटी प्लांट नागपूर जबलपूर महामार्गावरील कामठी नजीक स्थापित केला गेला आहे. त्याचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पेट्रोल आणि डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दिवसेंदिवस त्याचे दर वाढत चालल्यामुळे या इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल, इलेक्ट्रीक, सीएनजी, एलएनजी गॅसला भारत सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. आपल्या देशात साखर, तांदूळाचे उत्पादन अतिरिक्त प्रमाणात झाले असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही देशासमोरचे मोठे आव्हान आहे, असे गडकरींनी यावेळी सांगितले.
कृषीचे वैविध्यीकरण हे उर्जा क्षेत्रात होणे आवश्यक असून अतिरिक्त कृषी उत्पादनांपासून बायोइथेनॉलची निर्मिती करण्याचे प्रयोग झाले. ते यशस्वी ठरले. भातशेती साठी ओळखल्या जाणाऱ्या पुर्व विदर्भात बायोइथेनॉलची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू आहे. बायोमासमधून इथेनॉल, सीएनजी तयार करण्यात येत असून त्यापासून एलएनजी तयार करण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
एलएनजी वर ट्रक सारखी वाहने रुपांतरित करण्यासाठी १० लाख रुपये खर्च एकदाच येत असला तरी वाहतूक व्यावसायिकांना एलएनजीद्वारे पेट्रोल डिझेल वर दरवर्षी होणारी सुमारे ११ लाख रुपये बचत करता येणे शक्य होईल . एलएनजीचा देखभाल खर्चही कमी असल्याच गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
कॅनडा, ब्राझीमध्ये वाहनांमध्ये फ्लेक्स इंजिनचा वापर केला जातो. यात पेट्रोल किंवा दुसरे एखादे इथेनॉल सारखे इंधन वापरण्याचीदेखील सुविधा असते. हेच तंत्रज्ञान भारतातील वाहनांसाठी वापरण्यात येत असून पुढच्या तीन -चार महिन्यात सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांची निर्मिती करणा-या कंपन्यांना वाहनांमध्ये फ्लेक्स इंजिन वापरणे अनिवार्य करण्या संदर्भातील धोरणावर केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाद्वारे विचार सुरु आहे , असे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानानी युक्त असे एलएनजी इंधन असून देशांतर्गत महानगरांमधील वाहतूक असणाऱ्या महामार्गाच्या भोवताल असे एलएनजी स्टेशन उभारण्यात यावेत, असे आवाहनही गडकरी यांनी या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित वाहतूक व्यावसायिक , बैद्यनाथ आयुवेर्दिक उद्योग समुहाच्या पदाधिकाऱ्यांना केले.