ऑक्सिजन प्लांट हाताळणारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये; ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी, जिल्हयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. मागील कोरोना लाटेचा अनुभव विचारात घेत येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाहीयासाठीचे आवश्यक ते नियोजन करण्यासोबतच ऑक्सिजन प्लांटसंबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन प्रशिक्षित मनुष्यबळ तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या संबंधित वैद्यकीय अधिक्षक व औषध निर्माण अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी उपसंचालक तथा कोविड समन्वयक डॉ.नितिन बिलोरीकर, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेंडगे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हयातील वैद्यकीय अधिक्षक व औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्हयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. या ऑक्सिजन प्लांटसाठी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांची टिम तयार करण्याचे काम सूरु आहे. ऑक्सिजन प्लांटबाबत राज्यशासन व टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचे पालन करुन दिड वर्षात कोविड संबंधीत अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मागील कोरोना लाटेचा अनुभव विचारात घेत येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.