The deadline for autorickshaw meter calibration extended till 28th February.
ऑटोरिक्षा मीटर कॅलीब्रेशनकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
पुणे : मीटर कॅलीब्रेशनकरिता प्रलंबित असलेल्या ऑटोरिक्षांची संख्या लक्षात घेऊन ऑटोरिक्षा परवानाधारक आणि चालकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑटोरिक्षा मीटर कॅलीब्रेशनकरिता २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मुदतवाढ दिली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेतर्फे मीटर तपासणीसाठी अलंकार पोलीस ठाण्यासमोर कर्वेनगर, फुलेनगर आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट इगलबर्ग कंपनी लेन नं ३, दिवे (पासिंग वाहने) आणि इयॉन आयटी पार्कजवळ खराडी पोलीस चौकीसमोर ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
रिक्षाचालकांनी मीटर कॅलीब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी वरीलपैकी नजीकच्या ट्रॅकवर सादर कराव्यात.
विहीत मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी १ दिवस परवाना निलंबित करण्यात येईल. निलंबन कालावधी किमान ७ दिवस तर कमाल ४० दिवस राहील.
निलंबनाऐवजी तडजोड शुल्क भरण्याची तयारी असल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपयांप्रमाणे किमान ५०० रुपये तर कमाल २ हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही असे तडजोड शुल्क भरावे लागेल, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.