ओमायक्रॉनमुळे युरोपातल्या अनेक देशांनी नवे निर्बंध लागू.
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगानं वाढु लागल्यामुळे युरोपातल्या अनेक देशांनी नवे निर्बंध लागू केले आहेत.
फ्रान्स सरकारनं सार्वजनिक आणि बंदिस्त ठिकाणी होणाऱ्या मोठ्या समारंभ, नाईट क्लब, कॅफेसाठी वेळ आणि उपस्थितांच्या संख्येबाबत मर्यादा आणली आहे. मात्र नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केलेली नाही. यासोबतच कोविड प्रतिबंधक लसींच्या वर्धक मात्रेसाठी पात्रतेचा कालावधीही चार महिन्यांवरून तीन महिन्यांपर्यंत कमी केला आहे.
तिथे मागच्या शनिवारी १ लाखाहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून ही तिथली एका दिवसातली सर्वोच्च रुग्ण संख्या ठरली आहे. सध्या तिथली दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या ७० हजारावर पोचली आहे.
जर्मनीत अनेक राज्यांमध्ये जीम, जलतरण तलाव, नाईट क्लब आणि सिनेमागृह बंद केली आहे. लस घेतलेल्यांसाठीही १० पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यावर निर्बंध लागू गेले आहेत. या निर्बंधांविरोधत सोमवारी बौत्झेन इथं नागरिकांनी निदर्शनं केली. यात १० पोलीस जखमी झाले, तर पोलीसांनी १०० निदर्शकांना अटक केली.
ग्रीकमध्ये येत्या ३ जानेवारीपासून बार आणि रेस्टॉरंट मंध्यरात्रीनंतर बंद करायचे, तसेच एका टेबलावर केवळ ६ जणांनाच प्रवेश देण्याचे आदेश सरकारनं जारी केले आहेत. व्हिनसमध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी जमण्यास मनाई केली आहे.
या नियमांचं पालन न झाल्यास अशा ठिकाणी संगीत वाजवण्यावर बंदी घालायचा इशारा ग्रीक सरकारनं दिला आहे.डेन्मार्कमध्ये ओमायक्रॉनमुळे कोरोना पॉझीटीव्हिटी दर वाढला आहे. तिथे दर लाख लोकसंख्येमागे बाधित होण्याचं प्रमाण जगात सर्वाधिक १ हजार ६१२ इतकं झालं आहे. यामुळे तिथल्या सरकारनं सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तसंच बार आणि रेस्टॉरंटच्या वेळेवरही मर्यादा आणल्या आहेत.
आईसलँड आणि फिनलँड मध्येही बार आणि रेस्टॉरंटच्या वेळेवरही मर्यादा आणल्या आहेत.ब्रिटननं मात्र कोणतेही नवे निर्बंध घातलेले नाहीत. ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांना, नव्या वर्षाचं स्वागत करतांना अधिक दक्षता घ्यावी अशी सूचना तिथल्या आरोग्य विभागानं केली आहे.