कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीचा क्रीडा प्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, त्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी आसोसिएशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन, उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज केले.
अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन-महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर, उपाध्यक्ष दिनकर पाटील, शशिकांत गाडे, सहकार्यवाह ॲड आस्वाद पाटील, कोषाध्यक्ष मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, विश्वास मोरे, सच्चितानंद भोसले, मनोज पाटील यांच्यासह अन्य सदस्य ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकट काळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी अरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे, त्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे काम करण्याची गरज आहे. कबडी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणाऱ्या बदल आत्मसात करुन ते अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी नियमित कामकाज पूर्ण करण्यात आले व पुढील विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथे घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.