Congress clear majority in Karnataka assembly elections
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत
उद्धव ठाकरेंनी केलं राहुल गांधींचं अभिनंदन
कर्नाटकामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही.
“ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती!”, अशोक चव्हाणांचा भाजपावर हल्लाबोल
बेंगळुरू : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली असून स्वबळावर सत्ता स्थापन करेल असं चित्र निर्माण झालं आहे.
सत्ताधारी भाजपला इथं मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या जागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. तर एक्झिट पोलमध्ये जेडीएस किंगमेकर ठरणार असा अंदाज वर्तवला जात होता. पण, तो अंदाज साफ खोटा ठरला आहे.
काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.
निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होता. पण कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालाकडे फक्त एका राज्याचा निकाल म्हणून आता बघितलं जाणार नाही. कारण कर्नाटक निवडणुकीत भाजपने आणि पंतप्रधान मोदींनी पूर्ण ताकद लावली होती.
या पराभवाने भाजपच्या मिशन दक्षिणला जोरदार झटका बसला आहे. दक्षिणेत भाजपची फक्त कर्नाटकमध्येच सत्ता होती. या पराभवामुळे ते राज्यही भाजपच्या हातून निसटलं आहे. या वर्षी तेलंगणमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. पण कर्नाटमधील पराभवाने भाजपला मोठा झटका बसला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे. आतापर्यंत १८१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी ११३ जागा काँग्रेस, ४७ भाजपा, १७ जनता दल धर्मनिरपेक्ष आणि ४ जागा अपक्षांना मिळालेल्या आहेत. एकूण २२४ जागांचा विचार करता आघाडी आणि विजय मिळवून काँग्रेस १३६, भाजपा ६५, जनता दल धर्मनिरपेक्ष १९ आणि अपक्ष ४ जागांवर आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून काँग्रेसनं घेतलेली आघाडी कायम आहे.
उद्धव ठाकरेंनी केलं राहुल गांधींचं अभिनंदन
कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, – उद्धव ठाकरे
कर्नाटकामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही.
कर्नाटकामध्ये सरकार रिपीट होत नाही. २०१८ मध्ये आम्हाला जितकी मत मिळाले त्यात पॉइंट मत कमी झाली पण जागा कमी झाल्या. JdS ची पाच टक्के मत कमी होऊन ती काँग्रेसला गेली त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या. काही लोकांना देश जिंकलं असं वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे – देवेंद्र फडणवीस
“ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती!”, अशोक चव्हाणांचा भाजपावर हल्लाबोल
जनतेला विकास हवा आहे. देव-धर्माच्या नावावर राजकारण नको. देव-धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब आहे. त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर ‘ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती’, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निर्णायक विजयानंतर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. काँग्रेसला समाजाच्या सर्व थरातून पाठिंबा मिळाला. हा विकासाचा, सर्वसमावेशकतेचा आणि एकतेचा विजय आहे. रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हेच जनतेचे प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसने लोककल्याणकारी योजनांचा जाहीरनामा मांडला. त्यातील आश्वासने एका वर्षात पूर्ण करण्याचा शब्द दिला आणि लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे झाले, असे ते म्हणाले.
भाजप डबल इंजीनचा गवगवा करते. मात्र कर्नाटकमध्ये त्यांना विकास करता आला नाही. शेवटी देव-धर्माच्या नावावर मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला बंधुभावाचा संदेश लोकांना भावला. काँग्रेसच्या विचारधारेला समर्थन मिळाले. कर्नाटकातील विजयाचा पाया भारत जोडो यात्रेतच रचला गेला, असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com