कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठित.
राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.
महाराष्ट्रातील सर्व लोककला टिकून राहाव्यात,लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी लोककलांना उत्तेजन द्यावे या हेतूने कलापथकांना भांडवली खर्चासाठी आणि प्रयोगासाठी अनुदान देण्यात येते. या अनुदान मंजुरीसाठी शासनामार्फत समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.
या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष तर सहसंचालक हे सदस्य सचिव असतील. माया खुटेगावकर, सुधीर कलिंगण, दिनेश गोरे, अभय तेरदाळे, पुरुषोत्तम बोंद्रे, अलंकार टेंभुर्णे, सुरेशकुमार वैराळकर, अंबादास तावरे, विलास सोनावणे, मोहित नारायणगावकर हे या समितीत सदस्य असतील. ही समिती 8 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत कार्यरत असेल.