Understanding Artificial Intelligence Technology Important – Principal Secretary Brijesh Singh
कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे महत्त्वाचे – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
मराठीला एआयशी जोडण्याची गरज – राहुल पांडे
नागपूर : “कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आपल्या कामात अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा करते,” असे मत प्रधान सचिव आणि महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. “आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानातील मर्यादा एआयमुळे कमी होत असून, कोणत्याही भाषेत माहिती सहज उपलब्ध होते. त्यामुळे तंत्रज्ञानाला समजून घेऊन त्याचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी सांगितले.
नागपूर प्रेस क्लब व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर कार्यालयात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या विषयावर पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्री. ब्रिजेश सिंह बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे होते. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, संचालक डॉ. गणेश मुळे, किशोर गांगुर्डे आणि दयानंद कांबळे यांचीही उपस्थिती होती.
“तंत्रज्ञानामुळे संधी वाढतात”
श्री. सिंह म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या कमी करेल, अशी भीती व्यक्त होते. पण, वास्तवात तंत्रज्ञानामुळे नवीन संधी निर्माण होतात. मात्र एआय चा योग्य वापर न केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. एआयमुळे मिळणारी माहिती तपासणे, त्रुटी दूर करणे आणि ती नैतिक व संवैधानिकदृष्ट्या योग्य असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. एआयसह तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर केल्यास आपल्या कामात अधिक प्रभावीपणा येऊ शकतो.”
मराठीला एआयशी जोडण्याची गरज – राहुल पांडे
अध्यक्षीय भाषणात माजी माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी सांगितले की, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करताना भारताचे हित लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेला एआय तंत्रज्ञानाशी जोडणे गरजेचे असून, अशा कार्यशाळा अधिक व्हाव्यात.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन डॉ. गणेश मुळे यांनी, तर आभार प्रदर्शन दयानंद कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकारांसह अनेक माध्यम प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये व पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पद्धतीनेही या व्याख्यानाचा लाभ घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा