केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांची पुणे महानगरपालिकेला भेट.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आरोग्य राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. कोरोनाच्या काळात महापालिकेने केलेले काम आणि कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा त्यांनी आढावा घेतला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पदाधिकारी आणि महापालिकेचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. पवार यांनी सांगितले की, पुणे महापालिकेने शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून कोविड काळात उत्तम काम केले आहे. राज्यातील इतर महानगरपालिकांनी अशी योजना राबवावी. ‘जंम्बो’ कोविड सेंटर उभारुन रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात आल्या. महानगरपालिकेने कोविड प्रतिबंधक लसीबाबत प्रभावी जनजागृती केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले. तसेच कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेनं स्वतःच्या अर्थसंकल्पातून मदत केली याबाबत राज्यमंत्री डॉ. पवार यांनी महापालिकेचं अभिनंदन केले.
देशात कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या काळात आणखी सतर्कता बाळगावी लागेल असेही आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाय योजना केल्या असून जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना उपचारांबाबतच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असेही त्यांनी सांगितले