केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शवविच्छेदन प्रक्रियेविषयी नवीन दिशानिर्देश जारी.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शवविच्छेदन प्रक्रियेविषयी नवीन दिशानिर्देश जारी.

आवश्यक सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार.

मृतांच्या नातेवाईकांना तसेच दान केलेल्या अवयवांच्या प्रतीक्षेतील व्यक्तींसाठी हितकारक निर्णय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे विविध स्रोतांमधून प्राप्त झालेल्या सूचना आणि संदर्भांच्या आधारे मंत्रालयाने शवविच्छेदन प्रक्रियेविषयी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. सरकारी प्रक्रियांमधील अटी पूर्ण करताना होणारा त्रास वाचवून नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नांचा आणि वचनबद्धतेचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे. हे दिशानिर्देश आजपासून अंमलात येत आहेत. यानुसार शवविच्छेदन प्रक्रिया सूर्यास्तानंतरही करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना तर दिलासा मिळेलच, शिवाय अवयवदानाला आणि अवयवरोपणालाही चालना मिळू शकेल. मृत्यूनंतर ठराविक वेळेत अवयव काढून त्यांची जपणूक करण्याच्या कामाला शवविच्छेदन प्रक्रियेमुळे विलंब होतो, व अनेक वेळा अवयवदान अशक्य होऊन बसते. नवीन दिशानिर्देशांमुळे मात्र हे काम ठराविक कालमर्यादेत करणे शक्य होऊन, अवयवदानाला व रोपणाला चालना मिळू शकेल.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या आरोग्यसेवा महासंचालनालयातील तांत्रिक समितीने यासंबंधीच्या सर्व सूचनांचे परीक्षण केले होते. काही संस्थांमध्ये याअगोदरपासूनच शवविच्छेदन प्रक्रिया रात्रीही करण्यात येते, हे त्यात नमूद केले गेले. तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती पाहता, विशेषतः शवविच्छेदनासाठी आवश्यक प्रकाशयोजना आणि अन्य पायाभूत सुविधांची उपलब्धता लक्षात घेता, आता रुग्णालयांमध्ये रात्रीही शवविच्छेदन करता येऊ शकते. अवयवदान करण्याच्या दृष्टीने संबंधित शवविच्छेदन प्राधान्याने आणि अगदी सूर्यास्तानंतरही करण्यात यावे, असे या दिशानिर्देशांमध्ये सांगण्यात आले आहे. अशा प्रकारचे शवविच्छेदन करण्यासाठीच्या आवश्यक सुविधा नियमित उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयांमध्ये तसे करण्याची मुभा देण्यात आली आहे.

संबंधित सोयीसुविधांची स्थिती, उपयोगिता आणि उपलब्धता वेळोवेळी तपासून पुराव्यांमध्ये कोणतेही फेरफार न होण्याची खबरदारी रुग्णालय-प्रमुखाने घ्यायची आहे. रात्री होणाऱ्या सर्व शवविच्छेदनांचे ध्वनिचित्रमुद्रण करण्याची जबाबदारी रुग्णालयाची असेल, जेणेकरून शंकेला जागा उरणार नाही व भविष्यात कायदेशीर दृष्टीने संदर्भ म्हणून ते मुद्रण उपलब्ध राहील- असेही यात म्हटले आहे.

मात्र, हत्या, आत्महत्या, बलात्कार, विघटित मृतदेह, संशयास्पद कारवाया अशा श्रेणींमधील मृतदेहांचे विच्छेदन, कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित परिस्थिती असल्याखेरीज, रात्री करण्यात येऊ नये.

सर्व संबंधित मंत्रालये/ विभाग आणि राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना या नवीन दिशानिर्देशांविषयी अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *