जम्मू काश्मीर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून, आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, त्यांनी जम्मू इथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या नव्या परिसराचे उद्घाटन केले. आयआयटीचा हा नवा परिसर, 210 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला असून, या परिसरात, उच्च शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधांसह, उत्तम वसतिगृह आणि जीम तसेच इनडोअर खेळांची व्यवस्था आहे. अमित शाह यांच्या हस्ते, जम्मू आणि काश्मीरसाठीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन देखील झाले. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल, मनोज सिन्हा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शाह म्हणाले, की आज अत्यंत पवित्र दिवस आहे कारण आज प्रेमनाथ डोगरा यांचा जन्मदिवस आहे. केवळ जम्मूचेच नाही तर, देशातले लोकही प्रेमनाथ डोगरा यांचे योगदान कधीही विसरणार नाहीत. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह प्रजा परिषदेची स्थापना करत, त्यांनी ‘एक देश मे दो निशान, दो विधान और दो प्रधान नही चलेंगे’, असा नारा दिला.
जम्मूच्या नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचे युग आता संपले आहे, आणि आता कोणीही यापुढे त्यांच्यावर अन्याय करु शकणार नाही, असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.