केंद्रीय वित्त मंत्री येत्या सोमवारी राज्यांचे मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांशी करणार चर्चा.
केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार आहेत.
विविध मंत्रालयांचे सचिव, मुख्य सचिव आणि राज्यांचे वित्त सचिव देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.
कोविड-19 महामारी दरम्यान विकासावर परिणाम झाला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीनंतर, अर्थव्यवस्थेने पुन्हा वेग घेतला आहे आणि वाढीचे संकेत देणारे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. अर्थव्यवस्थेचे अनेक निदेशक आता महामारीपूर्व स्तरावर आले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा जीडीपी वृद्धी दर अनुक्रमे 9.5% आणि 8.3% राहील असा अंदाज वर्तवला आहे.
गुंतवणूकदारांचा उत्साह उत्तम असून अर्थव्यवस्थेतील या गतीचा फायदा करून घेण्याची गरज आहे.
राष्ट्रासाठी एकत्रित विकासाच्या दृष्टीकोनासह पुढे जाण्याचा आणि देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने खुल्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यावर वित्त मंत्र्यांचा भर आहे. गुंतवणुकप्रणित वाढीसाठी धोरणात्मक चर्चा आणि पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या चर्चेद्वारे केला जाईल. यासाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय दृष्टीकोन, व्यवसाय सुलभतेतील सुधारणामुळे आलेली कार्यक्षमतेता आणि शहरी स्थानिक संस्था स्तरापर्यंतच्या मंजुरी आणि परवानगी यांना गती देण्यावर भर दिला जाईल. संवादादरम्यान, गुंतवणुकीसाठी पूरक वातावरण निर्मितीबाबत राज्ये त्यांच्या कल्पना आणि दृष्टीकोन सामायिक करू शकतात, ज्यामुळे भारताला सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या मार्गाबाबत व्यापक सहमती होऊ शकेल.