जैव तंत्रज्ञान विभाग, मिशन कोविड सुरक्षा यांचे समर्थन लाभलेल्या बायोलॉजिकल ई-लिमिटेडच्या कॉर्बेव्हॅक्स या कोविड-19 प्रतिबंधक लसीला दोन क्लिनिकल चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून मान्यता मिळाली.
- प्रौढ लोकसंख्येमध्ये सक्रिय नियंत्रित तिसरा टप्पा क्लिनिकल चाचणी.
- लहान मुलांमध्ये आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये (5 वर्षे आणि त्याहून अधिक) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी.
जैव तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, यांनी कोविड -19 लसींच्या संशोधन आणि विकास व निर्मितीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
जैवतंत्रज्ञान विभाग आणि त्याची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बीआयआरएसी)ने बायोलॉजिकल ई.च्या कोविड -19 लसीच्या प्रीक्लिनिकल टप्पा ते तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचणीला पाठिंबा दिला आहे. मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्याबरोबरच, या लसीला बीआयआरएसीच्या नॅशनल बायोफार्मा मिशनच्या माध्यमातून कोविड -19 संशोधन समुहाअंतर्गत आर्थिक सहाय्य देखील लाभले आहे.
बायोलॉजिकल ई.ला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीच्या विषय तज्ञ समितीच्या आढाव्यानंतर प्रौढांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील तुलनात्मक सुरक्षा आणि प्रतिबंधक क्षमता चाचणी घेण्यासाठी भारतीय औषध महानियंत्रकांकडून मंजुरी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, बायोलॉजिकल ई.ने 01.09.2021 रोजी लहान मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये कोर्बेवॅक्स लसीची सुरक्षा, प्रतिक्रिया, सहनशीलता आणि प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी दुसरा टप्पा/तिसरा टप्प्यातील अभ्यास सुरू करण्यासाठी मान्यता प्राप्त केली. ही एक आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे.
डॉ. रेणू स्वरूप, सचिव, डीबीटी आणि अध्यक्ष, बीआयआरएसी या विषयावर बोलताना म्हणाल्या की, “बीआयआरएसी द्वारे राबवण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0 अंतर्गत सुरू केलेल्या मिशन कोविड सुरक्षेच्या माध्यमातून सुरक्षित आणि प्रभावी कोविड-19 लसींच्या विकासासाठी जैवतंत्रज्ञान विभाग वचनबद्ध आहे. आम्ही लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी कोर्बेवॅक्स लसीच्या क्लिनिकल विकासासाठी उत्सुक आहोत.
“भारतीय औषध महानियंत्रकाकडून ही महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. तसेच आमच्या संस्थेला पुढे जाण्यासाठी आणि लसीकरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोविड -19 लसीचे यशस्वी उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करते, ’’ असे बायोलॉजिकल ई-लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक महिमा दतला म्हणाल्या.