कोरेगाव भिमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पुर्वतयारीस वेग.
समाज कल्याण आयुक्तांनी घेतला आढावा
पुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात येत असून समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.
राज्य शासनाने प्रथमच या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि समाज कल्याण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तात्पुरती प्रशासकीय समिती गठित केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध विभागांच्या समन्वयक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांकडून केलेल्या तयारीचा आढावा समाज कल्याण आयुक्त डॉ.नारनवरे यांनी घेतला.
यावेळी पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच जिल्हा माहिती कार्यालय विभागनिहाय आढावा घेऊन, नियोजनासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रथमच हा कार्यक्रम शासनाच्यावतीने होत असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांच्या समन्वयाने कामे वेळेवर पूर्ण करावीत असे यावेळी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा देण्यासाठी तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी शासनाच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाय-योजनांचा शासकीय विश्राम गृह येथे आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, उपमहापौर सुनिता वाडेकर, यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.