Appeal to observe Indian Republic Day celebrations following the Corona Rules.
कोरोना नियमांचे पालन करुन भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभ पार पाडण्याचे आवाहन.
पुणे : येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभराप्रमाणे जिल्ह्यातही सकाळी ९.१५ वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे पालन करुन करण्यात येणार आहे.
या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजेच्यापूर्वी किंवा १० वाजेच्यानंतर करावा. तसेच समारंभ करताना शासनाच्या कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.
स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोद्धा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही मर्यादित नागरिकांनाच मुख शासकीय समारंभास निमंत्रित करण्यात येणार आहे.
प्रजासत्ताकदिनी दिवसभर विविध कार्यक्रम ज्यामध्ये वृक्षारोपण, शाळा आणि महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करता येईल. प्रभात फेऱ्या काढण्यात येऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ, सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गीते, भाषणे आयोजित करावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.