कोविडच्या ओमायक्रॉन व्हेरियंटविषयीची ताजी माहिती.
जोखीम’असलेल्या देशांमधून आलेल्या 11 आंतरराष्ट्रीय विमानांमधील 3476 प्रवाशांच्या तपासणीनंतर 6 जण कोविड-19 बाधित आढळले
बाधित रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवले
स्थितीवर भारत सरकारचे बारकाईने लक्ष
कोविड-19 च्या चिंताजनक समजल्या जाणाऱ्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळाल्यानंतर, आरोग्य विषयक प्रतिबंधक आणि व्यवस्थापनविषयक उपाययोजना म्हणून केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय
प्रवाशांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक नियमांच्या परिचालनाच्या पहिल्या दिवशी, सहा आंतरराष्ट्रीय प्रवासी कोविड बाधित आढळले आहेत.
देशात लखनौ वगळता विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ‘जोखीम’असलेल्या देशांमधून मध्यरात्रीपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत एकूण 11 आंतरराष्ट्रीय विमाने उतरली. यामधून 3476 प्रवासी भारतात उतरले. या सर्व 3476 प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी केवळ 6 प्रवासी कोविड-19 बाधित आढळले.
या कोविड-19 बाधित प्रवाशांचे नमुने संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणासाठी इन्साकॉग प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले आहेत. परिस्थितीवर भारत सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि संपूर्ण सरकार या दृष्टीकोनातून महामारीचा सामना करण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांना पाठबळ देत आहे.