केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडवीय यांनी जारी केली कोविड पश्चात उद्भवणाऱ्या गंभीर आजारांबाबत मार्गदर्शक तत्वे.
“जर आघाडीचे कर्मचारी योग्य ज्ञान आणि प्रशिक्षणासह सुसज्ज असतील तर ते कोविडनंतरच्या आव्हानांविरूद्धच्या लढ्यात एक मौल्यवान संसाधन बनू शकतात”: डॉ भारती प्रवीण पवार.
कोविड पश्चात उद्भवणाऱ्या गंभीर आजारांबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडवीय यांनी आज प्रकाशन केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यावेळी उपस्थित होत्या.कोविडच्या दीर्घकालीन परिणामांना सामोरे जाण्यासाठी भारतभरातील डॉक्टर, परिचारिका, निम-वैद्यकीय कर्मचारी आणि सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी ही मार्गदर्शक तत्वे उपयुक्त ठरतील.
मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, कोविडच्या दीर्घकालीन परिणामांच्या समस्येचा सामना करण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी ही तयार करण्यात आली आहेत.
ते पुढे म्हणाले, “स्टिरॉईडची जास्त मात्रा घेतल्यामुळे म्यूकरमायकोसिस सारखे कोविडनंतरचे दुष्परिणाम आपण पाहिले आहेत. कमी किंवा नगण्य दुष्परिणामांसह औषधे घेणे महत्वाचे आहे. जर आपण अगोदरच सतर्क राहिलो, तर कोविडच्या भविष्यातील परिणामांना तोंड देण्यासाठी ते फलदायी ठरेल. कोविड पश्चात असलेल्या समजांमुळे आपल्या समाजात कायमच भीतीचे वातावरण असल्याने, कोविडमुळे उद्भवलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्या हाताळणे महत्वाचे आहे. म्हणून, कोविडनंतरच्या या समस्या समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे महत्वाचे आहे. ”
यावेळी बोलताना डॉ.भारती प्रविण पवार यांनी मानसिक आरोग्याच्या समस्या हाताळण्याच्या आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या गरजेवर भर दिला. त्या म्हणाल्या, “या महामारीने आमच्या आरोग्याला आणि आरोग्य सेवा व्यवस्थेला अभूतपूर्व आव्हान दिले आहे. इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशासाठी मानसिक आरोग्य सेवा हे एक मोठे आव्हान आहे. मानसिक आरोग्याच्या या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपली क्षमता वाढवणे आवश्यक आहे. जर आघाडीचे कर्मचारी योग्य ज्ञान आणि प्रशिक्षणासह सुसज्ज असतील तर ते कोविडनंतरच्या आव्हानांविरूद्धच्या लढ्यात एक मौल्यवान संसाधन बनू शकतात. जेव्हा आपण कोविडनंतरच्या परिणामांविरूद्ध लढण्यासाठी स्वतःला सुसज्ज करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या प्रयत्नांमध्ये शेवटच्या व्यक्तीला देखील समाविष्ट करणे महत्त्वाचे असते.” त्या म्हणाल्या की कोविड-19 ही शेवटची मानवी महामारी ठरावी आणि यापुढे अशी आपत्ती निर्माण होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री राजेश भूषण, आरोग्य सेवा महासंचालक डॉ सुनील कुमार, आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.