The central government has decided to give the same dose of vaccine as in the previous vaccine.
कोविड प्रतिबंधक लसीकरणात आधी घेतलेल्या लशीचीच वर्धक मात्रा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
नवी दिल्ली : कोविड प्रतिबंधक लसीकरणात वर्धक मात्रादेखील आधी घेतलेल्या लशीचीच दिली जाईल, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्यांनी आधीच्या दोन्ही मात्रा कोव्हॅक्सिनच्या घेतलेल्या असतील. त्यांना वर्धक मात्राही कोव्हॅक्सिनचीच मिळेल, तर ज्यांनी आधीच्या दोन्ही मात्रा कोविशील्डच्या घेतल्या असतील त्यांना वर्धक मात्राही कोविशील्डचीच मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव, आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते. ओमायक्रॉनच्या चाचणीसाठीचा आरटीपीसीआर संच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि टाटा एमडी यांनी संयुक्तरित्या विकसित केला आहे, त्याला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे, असं भार्गव यांनी सांगितलं.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांमधे वाढत असलेली रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचं लव अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं. देशातल्या २८ जिल्ह्यांमधे रुग्णबाधित होण्याचा दर १० टक्क्यापेक्षा जास्त आहे, असं ते म्हणाले.
देशातल्या २४ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले असून त्यांची संख्या आता २ हजार १३५ वर पोचली आहे. त्यापैकी ८२८ रुग्ण बरे झाले असून, १ हजार ३०६ रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५३, तर त्याखालोखाल दिल्लीत ४६४, केरळमधे १८५ रुग्ण आढळले असल्याचं त्यांनी सांगितलं.