कोविड प्रतिबंधासाठी सर्व आवश्यक खबरदारी आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश.
- कोविड-19 अनुषंगाने मिळत असलेला सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद आणि लसीकरणाची प्रगती याबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसोबत केन्द्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी घेतली उच्चस्तरीय आढावा बैठक.
- कोणत्याही आत्मसंतुष्टतेसाठी जागा नाही: राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोविड -19 परिस्थितीचे तपशीलवार विश्लेषण करणे आणि पायाभूत सुविधा, औषधे तसेच मनुष्यबळ वाढवण्याचा दिला सल्ला.
- केंद्रीय आरोग्य सचिवांनी आगामी सणासुदीसाठी आवश्यक खबरदारी घेणे आणि नवी लाट टाळण्यासाठीच्या धोरणाची दिली माहिती.
- 11 राज्यांमध्ये आढळलेल्या सिरोटाइप -2 डेंग्यूच्या नियंत्रणाबाबतही केले मार्गदर्शन.
कोविड-19 चे व्यवस्थापन आणि प्रतिसाद धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज केन्द्रीय मंत्रिमंडळ सचिव श्री राजीव गौबा यांनी आढावा बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य सचिव श्री राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के पॉल, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य), प्रधान सचिव (आरोग्य), महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
काल एका दिवसात दिलेल्या 2.5 कोटींहून अधिक लस मात्रांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे अभिनंदन करत, आरोग्यसेवा कर्मचारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी आणि राज्य आरोग्य सचिवांच्या प्रयत्नांची मंत्रिमंडळ सचिवांनी प्रशंसा केली. लसींच्या वाढत्या उपलब्धतेमुळे लसीकरणाचा वेग कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
त्याचवेळी, त्यांनी राज्यांना आठवण करून दिली की आत्मसंतुष्टतेसाठी कोणतीही जागा नाही. त्यांनी कोविड प्रतिबंधक वर्तनाच्या (CAB) काटेकोर अंमलबजावणीच्या गरजेवर भर दिला.
कोविड -19 च्या अनेक लाटा पाहिलेल्या इतर देशांची उदाहरणे समोर आहेत, अशात त्यांनी पौझीटिवीटि जास्त असलेल्या देशातील काही विशिष्ट भागांबाबत चिंता व्यक्त केली.
संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी कोविडच्या प्रमाणाचे बारकाईने विश्लेषण करा, संबंधित आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये वाढ करा, अत्यावश्यक औषधांचा साठा करा, लवकरात लवकर मनुष्यबळ वाढवा असा सल्ला त्यांनी राज्य आरोग्य प्रशासकांना दिला.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी 11 राज्यांमध्ये सेरोटाइप -2 डेंग्यूच्या उभ्या ठाकलेल्या आव्हानावर प्रकाश टाकला. संख्यात्मक आणि गुंतागुंतीचा विचार करता तो रोगाच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक घातक आहे. त्यांनी राज्यांना रुग्ण लवकर शोधणे, तापा संबंधित हेल्पलाईन कार्यान्वित करणे यासारखी पावले उचलण्याची सूचना केली; चाचणी किट, अळीनाशके आणि इतर औषधांचा पुरेसा साठा; तत्काळ तपासणीसाठी शीघ्र कृती पथक तैनात करणे आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य कारवाई जसे की ताप सर्वेक्षण, रुग्णांचा माग काढणे, वेक्टर नियंत्रण; रक्त आणि रक्त घटकांचा पुरेसा साठा राखण्यासाठी रक्तपेढ्यांना सतर्क करणे, विशेषत: प्लेटलेट्स सज्ज ठेवणे. राज्यांना हेल्पलाईन, वेक्टर नियंत्रणाच्या पद्धती, घरातले आजाराला पूरक स्रोत कमी करणे आणि डेंग्यूची लक्षणे यासंदर्भात जनजागृती मोहिमा राबवण्याची विनंती केली .
15 राज्यांमधील 70 जिल्हे कॉविड 19 च्या बाबतीत चिंतेचे कारण ठरले आहेत कारण या जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी 10%पेक्षा जास्त आहे आणि 36 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी 5%-10%च्या दरम्यान आहे हे आरोग्य सचिवांनी राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या लक्षात आणून दिले.
आगामी सणांच्या मोसमाच्या पार्श्वभूमीवर, बंदिस्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा जमाव आणि गर्दी टाळण्याच्या दृष्टीने, सर्व आवश्यक खबरदारी आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. मॉल, स्थानिक बाजारपेठ आणि प्रार्थनास्थळांबाबत लागू असलेल्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तन आणि कोविड संसर्गापासून सुरक्षित उत्सवांच्या प्रचारासाठी माहिती, जागृती आणि संपर्क उपक्रम हाती घेण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांसंदर्भात मिळणारे संकेत लवकर ओळखणे आणि प्रतिबंध लागू करणे तसेच कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाचे पालन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांतील कोविड रुग्णवाढीच्या गतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.
कोविड -19 व्यवस्थापनाच्या दृष्टीने, पंचसूत्रीयुक्त कोविड नियंत्रण धोरण (चाचणी, उपचार, मागोवा, लसीकरण, कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तनाचे पालन): कोरोना रुग्णाचे लवकर निदान होण्यास मदत म्हणून चाचण्यांमध्ये वाढ, भविष्यातील सज्जतेसाठी आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार (ग्रामीण भाग आणि बालरोग रुग्णांना प्राधान्य देणे), संपर्क शोध , देखरेख ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय आणि मोठ्या प्रमाणात रुग्ण नोंदीचा अहवाल देणाऱ्या समूहामध्ये काटेकोरपणे कार्यवाही , सर्व प्राधान्य वयोगटांचे लसीकरण करण्यावर लक्ष ठेवणे आणि योग्य लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यावर सतत लक्ष केंद्रित करणे यावर पुन्हा जोर देण्यात आला आहे.
रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ, ऑक्सिजनची उपलब्धता, आपात्कालीन औषधांचा अतिरिक्त साठा, रुग्णवाहिका सेवा आणि आयटी प्रणाली/ हेल्पलाइन/ टेलिमेडिसिन सेवांची अंमलबजावणी यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे, याची नोंद घेण्यात आली आहे. आरोग्य सचिवांनी सांगितले की, आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेज अंतर्गत सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना निधी जारी करण्यात आला आहे या निधीचा उपयोग त्वरित आणि चांगल्या प्रकारे करण्यात यावा .
जिल्हास्तरीय आढावा घेणे तसेच पुरेशा वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि अपेक्षित आवश्यकतांनुसार पुरवठा तातडीने करणे सुनिश्चित करण्याचे आवाहन मुख्य सचिवांना करण्यात आले. पुढे, आवश्यकता निर्माण झाल्याच्या आधारावर खाजगी क्षेत्रातील क्षमता देखील योग्यरित्या शोधून तैनात केल्या जाऊ शकतात.
कोणतीही नवीन संसर्गवाढ टाळण्याच्या दृष्टीने सर्व शक्य प्रयत्न करण्यासाठी, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन राज्यातील अधिकाऱ्यांना करण्यात आले:
कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तनाचे पालन आणि कोविडप्रतिबंधापासून सुरक्षित सणांचे पालन सुनिश्चित करा
मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांची नोंद करणाऱ्या विभागामध्ये तीव्र निर्बंध लागू करा आणि सक्रिय देखरेख ठेवा आणि निर्बंध लागू करण्यास विलंब करू नका.
- आरटी-पीसीआर गुणोत्तर राखत चाचणी क्षमता वाढवा
- पीएसए ऑक्सीजन संयंत्र, ऑक्सिजन सिलिंडर, कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर त्वरित सुरू करणे
- पुरेशा जागेसह तयारी सुनिश्चित करण्यासाठी ECRP-II च्या प्राधान्य अंमलबजावणीचा नियमित आढावा
- काही राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत हे लक्षात घेऊन मुलांमध्ये पसरणाऱ्या संसर्गावर लक्ष ठेवा
- लसीकरणानंतर संक्रमण झाल्यास त्यावर देखरेख ठेवा आणि मिळालेल्या पुराव्यांचे विश्लेषण करा
- जनुकीय क्रम निर्धारणासाठी पुरेसे नमुने पाठवण्यासह उत्परिवर्तनांचे निरीक्षण करा
- लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवा
- डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य रोगांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करा