कोविड युगानंतर पर्यटन क्षेत्राच्या कायाकल्पाचे कारण यशस्वी कोविड लसीकरण प्रकल्प हे आहे: केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी.
अग्वादा किल्ला, से कॅथेड्रल आणि कुर्डी महादेव मंदिरात येणाऱ्यांसाठी अधिकाधिक सुविधा, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज उत्तर गोव्यातील अप्पर फोर्ट, अग्वादा येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात कोंडोलीमधील फोर्ट अग्वादा, जुने गोव्यातील से कॅथेड्रल आणि कुर्डी येथील महादेव मंदिर इथल्या विकासकामांसाठी अभ्यागतांच्या सुविधा आणि रोषणाईसाठी पायाभरणी फलकांचे अनावरण केले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या देखरेखीखाली राष्ट्रीय संस्कृती कोष यांच्यासह इंडियन ऑइल फाउंडेशनने अनेक विकासकामे केली आहेत. पुरातत्व सर्वेक्षण विभाग गोवा मंडळाअंतर्गत वर नमूद केलेल्या ठिकाणी पर्यटक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या सुविधांमध्ये पार्किंग, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अभ्यागतांच्या सोयीसाठी मार्ग, लँडस्केपिंग, बसण्यासाठी आसने, सुशोभित कमानी, विद्युत रोषणाई, फलक इत्यादींचा समावेश आहे.
गोव्याच्या स्वातंत्र्याची 60 वर्षे आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असा सुंदर योग जुळून आल्याचे सांगत रेड्डी म्हणाले. “कोविड19 चा मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसला आहे. देशात गोवा हे सर्वाधिक पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे सर्वाधिक तेच यामुळे प्रभावित राज्य होते. महामारीमुळे गोव्यावर कितीही संकट आले तरी केंद्र सरकार गोवा सरकार आणि गोव्यातील जनतेच्या पाठीशी उभे राहील, असे रेड्डी यांनी सांगितले.
भारत सरकारच्या यशस्वी लसीकरण धोरणामुळे पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. पर्यटन स्थळांच्या विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंतीही मंत्र्यांनी राज्य सरकारच्या विभागांना केली.
पर्यटन क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने राज्यातील पर्यटन स्थळांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. गोव्यातील पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली.