PM directs to provide necessary technical support to states with a high number of Covid-19 patients.
कोविड-१९ ची रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना आवश्यक तांत्रिक पाठबळ पुरवण्याचे प्रधानमंत्र्यांचे निर्देश.
दिल्ली : कोविड-१९ चे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या भागांमधे कडक प्रतिबंध आणि सर्तकता कायम ठेवण्याचे, तसंच रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना आवश्यक तांत्रिक पाठबळ पुरवण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
देशातल्या वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एकंदर कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यनिहाय स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी, त्यात चांगल्या उपाययोजना आणि लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद याबद्दल चर्चा करता येईल, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
सध्या कोविड परिस्थिती हाताळतांना इतर आरोग्य सेवाही सुरळित राहतील, याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दुर्गम आणि ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी टेलीमेडिसिनचा उपयोग करुन घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुखपट्टीचा वापर, आणि सुरक्षित उपाययोजना अंगवळणी पडल्या पाहिजेत, असं ते म्हणाले. यावेळी जगभरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत तपशीलवार माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली.
त्याबरोबरच देशातली कोविड-१९ बाबतची सद्यस्थिती रुग्णसंख्या वाढत असलेल्या आणि बाधीत होण्याचा दर जास्त असलेल्या राज्यं आणि जिल्ह्यांबद्दलची माहितीही त्यावेळी देण्यात आली. जिल्हापातळीवर पुरेशा आरोग्यवविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध असतील, याची काळजी घेतली पाहिजे, याबाबतीत राज्यांशी समन्वय राखण्याचे निर्देश प्रधानमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री मनसुख मांडविय, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.