कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना तातडीने मदत मिळवून द्या
-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना, लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास प्राधान्य द्या. त्यासाठी बँक खाती काढणे, गृहचौकशी पूर्ण करणे आदी कामांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावून आठवडाभरात ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
कोव्हीड- 19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन जिल्हा कृतीदलाची बैठक डॉ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस पुणे चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अजय चरथनकर, कृती दलाचे समन्वयक तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे परम आनंद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हा परिवीक्षा अधिकारी निलकंठ काळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत दोन्ही पालक गमावले आहेत अशी 70 बालके आढळून आली आहेत. यापैकी 43 बालकांची बँकेत खाती उघडण्यात आली असून 19 बालकांच्या खात्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांची मुदत ठेव जमा करण्यात आली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावर उर्वरित सर्व बालकांची माहिती जमा करणे, पालकत्वाचे प्रश्न मार्गी लावणे तसेच बँक खाती उघडण्यास प्राधान्य देऊन पुढील 15 दिवसात हे काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या.
कोविडमुळे एक पालक, तसेच दोन्ही पालक गमावेल्या एकूण 2 हजार 647 बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. कोविड ऑर्फन पोर्टल, पीएम केअर पोर्टल, एनसीपीआर पोर्टलवर माहिती भरण्याचे काम मोठे असून हे काम अतिरिक्त मनुष्यबळ लावून तात्काळ पूर्ण करावे. या बालकांची माहिती गृहचौकशीद्वारे मिळवावी लागते. त्यासाठी त्या- त्या तालुक्यातील महिला व बालविकास विभाग, बाल सरंक्षण अधिकारी तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेऊन चौकशीचे काम पूर्ण करावे.
बाल संगोपन योजनेचा लाभ विशेष मोहीम हाती घेऊन प्राधान्याने दिला जावा. दोन्ही पालक गमावलेली तसेच एक पालक गमावलेली बालके, कोविडमुळे पती गमावून विधवा झालेल्या महिला यांना शासनाच्या सध्याच्या योजनांचा लाभ देण्याला प्राधान्य द्यावे जेणेकरुन त्यांना तातडीची मदत मिळू शकेल, असे निर्देशही डॉ. देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिले. संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य योजनांचे लाभ पात्र महिलांना देण्याबाबतच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या असून आतापर्यंत सुमारे 170 महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.चरथनकर यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने कोविडमुळे विधवा झाले महिलांना रोजगारक्षम करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार सिम्बॉयसीस संस्थेला सोबत घेऊन या महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच विविध उद्योगांबरोबरही समन्वय केला असून त्यानुसार नोकरी करु इच्छिणाऱ्या महिलांना नोकरी आणि अन्य महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. असे उपक्रम इतर ठिकाणीही राबवण्याबाबत विचार करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.