कोविड-19 विरोधात लसीकरण हे प्रभावी अस्त्र; लसीकरणाचा वेग आणि त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेऊया- डॉ मनसुख मांडविय.
कोविड-19 लसीकरणाच्या अखेरच्या टप्यात आपण आलो असून लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवत संपूर्ण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेऊ या असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. मणिपूर, मेघालय, नागालॅन्ड आणि पुद्दुचेरी इथल्या आरोग्य सचिव आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी आज दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या राज्ये/केंद्रशासित प्रदेशातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा आणि हर घर दस्तक अभियानाचाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या राज्ये/केंद्रशासित प्रदेशात लसीकरणाची व्याप्ती कमी नोंदवली गेली आहे.
कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात लसीकरण हे प्रभावी अस्त्र असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. राज्ये/केंद्रशासित प्रदेशानी, स्वयंसेवी संस्था, धार्मिक नेते, यांच्यासह इतर संबंधितांच्या मदतीने लसीकरणासाठी पात्र लोकांना संपूर्ण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. देशात कोणताही पात्र नागरिक कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या सुरक्षा कवचापासून वंचित राहू नये याची सर्वांनी मिळून खातरजमा करत, लस घेण्यासाठी टाळाटाळ, दिशाभूल करणारी माहिती यासारख्या मुद्यांची दखल घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्व राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी आठवड्यातल्या एका दिवशी पात्र घराला भेट देऊन त्यातल्या कुटुंबियांना संपूर्ण लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी सुचवले. आपल्या कुटुंबातल्या, समाजातल्या वयोवृद्ध आणि पात्र सदस्यांना लसीच्या दोन्ही मात्रा घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता विद्यार्थी आणि बालकांना लसीकरण दूत करता येईल असेही त्यांनी राज्यांना सुचवले.