आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज 2017-8 आणि 2018-19 या वर्षांसाठीचे राष्ट्रीय युवक पुरस्कार प्रदान केले.
भारताचे युवक एआय अर्थात आत्मनिर्भर नवोन्मेषी संशोधनाच्या संकल्पनेची प्रेरकशक्ती आहेत : अनुराग ठाकूर
अनुराग ठाकूर यांनी एस.ओ.एल.व्ही.ई.डी. स्पर्धेच्या विजेत्यांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित केले.
2017-18 या वर्षासाठीचे एकूण 14 आणि 2018-19 या वर्षासाठीचे एकूण 8 पुरस्कार देण्यात आले.
व्यक्तिगत पातळीवरील पुरस्कारात पदक, प्रमाणपत्र आणि 1 लाख रुपये रोख यांचा समावेश आहे तर पदक, प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपये रोख असे संस्थांना दिल्या गेलेल्या पृस्काराचे स्वरूप आहे.आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात 2017-18 आणि 2018-19 या वर्षांसाठीचे राष्ट्रीय युवक पुरस्कार प्रदान केले. आंतरराष्ट्रीय युवक दिन-2021 निमित्त अनुराग सिंग ठाकूर यांनी एस.ओ.एल.व्ही.ई.डी. (सामाजिक ध्येयांद्वारे प्रेरित उद्योग विकास) या कृषी-उद्योगांवर आधारित स्पर्धेच्या विजेत्या युवा उद्योजकांना देखील पुरस्काराने सन्मानित केले. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा युवक व्यवहार विभागाच्या सचिव उषा शर्मा, संयुक्त राष्ट्रांच्या भारतासाठीच्या निवासी प्रतिनिधी डेयरडे बॉइड यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुरस्कार वितरण समारंभात बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, “आजचा दिवस, संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या वार्षिक सोहोळ्याचा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय युवक दिन म्हणजे फक्त कॅलेंडरमधील एक तारीख नव्हे. भारतातील युवावर्ग “भारताचे भविष्य” तर आहेच पण अधिक महत्त्वाचे म्हणजे हे युवक “भारताचा वर्तमानकाळ” आहेत. हे युवक ए आय अर्थात आत्मनिर्भर नवोन्मेषी संशोधनाच्या युगातील नव्या संकल्पना आणि संशोधनांची प्रेरकशक्ती आहेत.
“यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय युवक दिनाची मध्यवर्ती संकल्पना अन्न पद्धतींमधील परिवर्तनावर लक्ष केंद्रित करणारी आहे आणि युवकांचा सहभाग हा या परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या युवकांनी केलेले कृषी-तंत्रज्ञान विषयक नाविन्यपूर्ण संशोधन या क्षेत्रात अनेक नव्या पद्धतींना जन्म देत आहे. तरुणांच्या अर्थपूर्ण सहभागाशिवाय अशा प्रकारच्या जागतिक प्रयत्नांना यश मिळणार नाही.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने व्यावसायिक शिक्षण, कौशल्य, स्टार्ट अप्स तसेच आपल्या युवा नागरिकांना आर्थिक मदत करणे यासारखे विविध उपक्रम राबविण्याला प्राधान्य दिले आहे. भारतातील तरुणांना जगातील सर्वात मोठे कौशल्याचे भांडार करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. राष्ट्रीय युवा पुरस्काराच्या सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी देशातील युवा वर्गाला प्रेरित करणे हा या पुरस्कारांच्या प्रदानामागचा आमचा उद्देश आहे,” असे अनुराग ठाकूर यांनी पुढे सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या भारतासाठीच्या निवासी प्रतिनिधी डेयरडे बॉइड म्हणाल्या की भारताकडे जगाला देण्यासारखे खूप काही आहे, भारतात तरुणांची लोकसंख्या खूप आहे. तरुण लोकांकडे बदल घडवून आणण्यासाठीची उर्जा असते, देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडे नव्या आणि अभिनव कल्पना असतात.
आजच्या पुरस्कार वितरण समारंभात, व्यक्तिगत आणि संस्था अशा दोन्ही विभागातील मिळून एकूण 22 राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात आले, 2017-18 या वर्षासाठीचे एकूण 14 पुरस्कार देण्यात आले, यात 10 व्यक्तिगत आणि 4 संस्थागत विभागातील पुरस्कार आहेत. 2018-19 या वर्षासाठी एकूण 8 पुरस्कार देण्यात आले, यामध्ये 7 व्यक्तिगत आणि 1 संस्थेला देण्यात आलेला पुरस्कार यांचा समावेश आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यक्तिगत पुरस्कारासाठी 1 लाख रुपये रोख तर संस्थेला 3 लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते.
महाराष्ट्र आणि गोव्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते.
महाराष्ट्रातून सौरभ नावंदे, चेतन महादू परदेशी, रणजितसिंग संजयसिंग राजपूत यांना वर्ष 2017-18 साठी तर सिद्धार्थ रॉय यांना वर्ष 2018-19 साठी समाज सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात आले.
गोवा राज्यातून गुणाजी मांद्रेकर यांना समाज सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ष 2018-19 साठीचा राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात आला.
राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्यांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
समाज सेवा आणि विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये योगदान देऊन उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्ती (15 ते 29 वर्षे या वयोगटातील) तसेच संस्थांना केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक व्यवहार विभागातर्फे राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात येतात.
केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक आणि संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम यांनी संयुक्त सहभागातून डिसेंबर 2020 मध्ये एस.ओ.एल.व्ही.ई.डी.स्पर्धेची सुरुवात केली. देशाच्या ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील युवकांनी सुरु केलेल्या कृषी-अन्न मूल्य साखळीतील उद्योजकता संवर्धनाविषयी युवक-प्रेरित नाविन्यपूर्ण उपक्रमांना ओळखून त्यांना खतपाणी घालण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील 850 हून अधिक युवकांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि अनेक उप-स्पर्धांतील पात्रता आणि प्रशिक्षणानंतर 10 विजेते घोषित करण्यात आले.