खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन, कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार.
महाविकास आघाडीचे खासदार संसदेच्या अधिवेशात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार.
मुंबई :- सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन – कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप सुरु आहे, त्याला गती देण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलेले अनुदान तसेच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बँकांनी रोखू नये. सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात येतील. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह ‘सीएसआर’ फंडातून मदत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. कृषीपंपांना दिवसा सुरळीत आणि पुरेसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सौरपंपाची योजना आणली आहे, ही योजना अधिक सक्षमपणे राबविण्यात यावी. कर्जमाफीला पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.